पुणे : जगातील प्रसिद्ध वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या ग्लेन मॅकग्राचा आज 52 वा वाढदिवस आहे. 9 फेब्रुवारी 1970 रोजी जन्मलेल्या मॅकग्राने आपल्या अचूकतेने जगभरातील भल्या-भल्या फलंदाजांना अडचणीत आणले. तब्बल 14 वर्षे मॅकग्राने वेग, लाईन आणि लेन्थने आघाडीच्या फलंदाजांना त्रास दिला. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले.
तो ऑस्ट्रेलियन संघाचा एक महत्त्वाचा भाग होता ज्यांचा विजय रथ रोखणे सोपे नव्हते. मॅकग्राने 1993 मध्ये पदार्पण केले आणि 2007 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. आज मॅकग्राच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही खास विक्रमांवर या लेखातून प्रकाश टाकणार आहोत.
अशी होती मॅकग्राची आंतरराष्ट्रीय कामगिरी
आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत, मॅकग्राने 21.64 च्या आश्चर्यकारक सरासरीने 563 कसोटी बळी घेतले आहेत. तो अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांपैकी सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. यामध्ये 29 वेळा एका डावात पाच बळी आणि 3 वेळा एका सामन्यात दहा बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. दुसरीकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये मॅकग्राकडे 381 फलंदाजांची शिकार केली आहे. यामध्ये एका सान्यात 15 धावांत 7 बळी हि त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज
आजपर्यंत, मॅकग्रा हा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज आहे. त्याने 21.76 च्या सरासरीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 949 बळी घेतले आहेत, तो वेगवान गोलंदाजांमध्ये आघाडीवर आहे. तर मुथय्या मुरलीधरन (1,347), शेन वॉर्न (1,001) आणि अनिल कुंबळे (956) नंतर चौथा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बळी
मॅकग्रा हा ऑस्ट्रेलियाच्या तीन विश्वचषक-विजेत्या मोहिमांचा (1999, 2003 आणि 2007) भाग होता. विश्वचषकाच्या इतिहासात आजही त्याच्या नावावर सर्वाधिक बळी आहेत. त्याने खेळलेल्या विश्वचषकातील 39 सामन्यांमध्ये, 71 बळी घेतले आहेत. त्याच्यानंतर दुसर्या स्थानी मुरलीधरन आहे. मुरलीधरनने 68 बळी घेतले आहेत. त्याने 2007 मध्ये खेळलेल्या त्याचा
शेवटचा विश्वचषक त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट होता. ज्यात त्याने 26 बळी घेतले होते.
हॅट्रिकसह पूर्ण केले कसोटी क्रिकेटमधील 300 बळी
2000 मध्ये, मॅकग्रा 300 कसोटी बळी घेणारा फक्त तिसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनला. त्याने ऐतिहासिक हॅट्रिक घेताना कसोटीत 300 बळींचा टप्पा गाठला.
’पिजन’ टोपणनावामागची गोष्ट
ग्लेन मॅकग्राचे टोपणनाव ’पिजन’ आहे. हे प्रत्येक क्रिकेटप्रेमीला माहीत आहे. पण संघातील सहकारी त्याला या नावाने का हाक मारायचे हे फार कमी लोकांना माहीत आहे. वास्तविक, कबुतराला इंग्रजीत पिजन म्हणतात.
मॅकग्रा जेव्हा पदार्पण केले तेव्हा तो खूप हडकुळा होता, त्याचे पाय दिसायला खूपच कमकुवत होते, त्याचवेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रॅड मॅकनमाराने मॅकग्राला गंमतीत सांगितले की, तू कबुतराचे पाय चोरून आला आहेस. मग काय होत, तेव्हापासून मॅकग्राचे टोपणनाव पिजन असे झाले.
इतर विक्रम
100 कसोटी सामने खेळणारा मॅकग्रा हा एकमेव ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज आहे. त्याने ऑक्टोबर 2004 मध्ये भारताविरुद्ध नागपुरात ही कामगिरी केली होती.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करण्याचा विक्रम मॅकग्राच्या नावावर आहे. त्याने 104 फलंदाजांना शून्यावर बाद केले आहे.