कालावधी 20 मार्च 1998 ते 20 मार्च 1999
पिंपरी चिंचवड शहराचे भूषण असलेले भक्ती शक्ती शिल्प, डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा, पुणे-मुंबई हायवे आणि पिंपरीला जोडणारा पूल, आज शहराची वेगळी ओळख निर्माण करुन डौलाने उभे आहेत. त्याची मुहूर्तमेढ करण्यामागे एका सच्चा माणसाची मेहनत आणि जिद्द आहे. ते म्हणजे माजी महापौर हनुमंत भोसले. सन 1998-99 या काळात त्यांनी महापौरपद भूषवले. फक्त भूषवलेच नव्हे त्यांच्या कारकीर्दीने ते गाजवलेही.
पिंपरी चिंचवड महापालिकेत सन 1998 साली नेहरूनगरचे हनुमंत भोसले महापौरपदी विराजमान झाले. अल्पावधीतच त्यांनी सर्वसामान्यांचा महापौर म्हणून आपली छाप शहरवासीयांच्या मनावर पाडली. सर्वसामान्यांना आपल्या समस्या मांडता आल्या पाहिजेत. यासाठी जनता दरबार सुरू करणारे भोसले हे पहिले महापौर होत. त्यांनी जनतेच्या समस्या पहिल्यांदा समजावून घेतल्या. त्या सोडविण्यासाठी त्यांनी वर्षभराच्या काळात मेहनत घेतली.
जनता दरबारामध्ये प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जायची. त्यातून कोणत्या भागामध्ये काय अडचणी आहेत याची माहिती त्यांना झाली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गणेश फेस्टिव्हलची सुरूवात त्यांच्याच कार्यकाळात झाली. फेस्टिव्हलसाठी अनेक नामांकित लोकांचे कार्यक्रम घेतले. पहिला गणेश फेस्टिव्हलचा कार्यक्रम आण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावर पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गायक सोनू निगम उपस्थित होते. या कार्यक्रमाने गणेश उत्सवाला एक वेगळे रूप आले.
महापौर हनुमंत भोसले यांनी अनेक विकासकामे केली. त्यामध्ये पुणे-मुंबई हायवे व पिंपरीला जोडणारा स्वर्गीय इंदिरा गांधी उड्डाणपूल त्यांच्या काळात बांधण्यात आला. तसेच पिंपरी चिंचवड शहराचे भूषण म्हणून आज भक्ती शक्ती शिल्पाचा उल्लेख केला जातो. या शिल्पाच्या भूमिपूजनाचे काम त्यांच्या हस्ते करण्यात आले. शहरामध्ये पिंपरी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. हा पुतळा पहिले अर्ध पुतळा होता. भोसलेंच्या प्रयत्नाने त्याठिकाणी डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. आज त्याठिकाणी भीमसृष्टी निर्माण करण्यात आली आहे. ज्यामुळे शहराच्या वैभवामध्ये
भर पडली.
शहरातील नेहरुनगरमध्ये आज कधीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, त्यापाठीमागे हनुमंत भोसले यांची दूरदृष्टी कामी आली आहे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये नेहरुनगरमध्ये तीन भव्य टाक्यांची बांधणी केली. खेळाच्या बाबतही ते नेहमीच जागरुक होते. शहरातील मुले चांगले खेळाडू झाले पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असायचा. त्यासाठी त्यांनी मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदान बांधले. तसेच अण्णासाहेब मगर स्टेडियमही प्रथम उपमहापौर असताना बांधले.
राष्ट्रीय नेत्यांचे प्रिय व्यक्तिमत्त्व
नेहरुनगरमधून हनुमंत भोसले यांनी निवडणूक लढवली. राष्ट्रवादी पक्षातील बड्या नेत्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांची ओळख झाली. कारण राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. ते महापौर असताना 12 महिन्यांच्या कालावधीत 14 वेळा शरद पवार महापालिकेमध्ये आले. शरद पवार यांची शहराच्या विकासावर बारीक नजर होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच भोसले यांनी शहराचा विकास केला.
भूमिपूजन करणाऱ्यालाच विसरले
शहराची वेगळी ओळख असणाऱ्या अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन हनुमंत भोसले यांनी केले. त्यांनी महापौर असताना अनेक कामांची आखणी केली परंतु जेव्हा उद्घाटनाची वेळ आली तेव्हा मात्र त्यांना डावलण्यात आल्याचे शल्य स्थानिक नागरिक बोलून दाखवितात. हनुमंत भोसले यांनी महापौर असताना अनेक कामांची आखणी केली.
ती कामे महासभेत मंजूर करुन घेतली, त्या कामांचे भूमिपूजनही केले. त्यानंतर पुढच्या तीन-चार वर्षांत ती कामे पूर्ण झाली. त्यानंतर त्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र त्यासाठी त्यांना वेळोवेळी टाळण्यात आले. आजही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामामध्ये भूमिपूजन कोणाच्या हस्ते झाले याचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही.