वडिलांच्या पाऊलवाटांवर दमदार वाटचाल : सयंमी, जबाबदार नेतृत्व – माजी महापौर संजोग वाघेरे

कालावधी : 20 मार्च 1995 ते 21 मार्च 1996

पिंपरी चिंचवड शहर उद्योगनगरी होण्यासाठी संजोग वाघेरे यांची मोलाची साथ लाभली. त्यांनी कंपन्यांना अनेक बाबतीत सूट देत कंपन्या उभ्या केल्या. शहरातील मोठ्या कंपन्यांना त्यांनी पडत्या काळात हात दिला. त्याचीच परिणिती म्हणून आज शहर एक उद्योनगनगरी म्हणून ओळखले जात आहे. महापौर झाल्यानंतर त्यांनी आपले वडील कै. भिकू वाघेरे पाटील यांचे शहर विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट घेतले.

वडिलांनी वैराण माळरानावर विकासाची शेती फुलवली, उद्योगांच्या उभारणीसाठी अतोनात कष्ट घेतले, पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला, त्याच विकासवाटांवरील वडिलांच्या पाउलखुणांवर पावले टाकली त्यांच्या सुपुत्रानेही या शहराच्या भरभराटीत मोलाची भर घातली. महानगरपालिकेचे दुसरे महापौर कै. भिकू वाघेरे पाटील यांचे सुपुत्र संजोग वाघेरे पाटील यांनीही महापौर होऊन आपल्या पित्याचे शहर विकासाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण केले.

पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. शहरामध्ये अनेक कंपन्या उभ्या आहेत. त्यामध्ये लाखो कर्मचारी आज काम करत आहेत. यापाठीमागे शहरातील अनेक मान्यवरांचा हात आहे. त्यामध्ये माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. त्यांनीही महापौर असतानाच्या कालावधीत महत्त्वाचे निर्णय घेत उद्योगांना हातभार लावला. यासोबतच अनेक विकासकामे करत शहराचा विकसित चेहरा समोर आणला.

वडील भिकू वाघेरे पाटील यांच्या निधनानंतर संजोग वाघेरे पाटील यांची 1987 साली महापालिकेमध्ये नगरसेवक पदावर बिनविरोध निवड झाली. त्यानंतर 1995-96 या काळात त्यांनी महापौर पद भूषवले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी शहरामध्ये विकासकामांचा धडाका लावला. आकुर्डी येथे आकुर्डी व चिंचवडला जोडणारा रेल्वे उड्डाणपूल त्यांच्या प्रयत्नामुळे झाला. शहरामध्ये रेडझोनची रेंज 1145 इतकी होती. ती 560 यार्ड करण्याचे महत्त्वाचे काम वाघेरे यांनी केले. आळंदी रोडचा बहुतांश भाग बाधित होता. पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपरी गाव येथील रेडझोनचा प्रश्‍न शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना बोलावून सोडवला.

शहरामध्ये आज दुर्गादेवी टेकडी शहरातील नागरिकांना पर्यटनासाठी खुली आहे. त्यामागे संजोग वाघेरे यांची मेहनत आहे. त्यांनी दुर्गादेवी टेकडीचा काही भाग संरक्षण खात्याकडून महापालिकेच्या अखत्यारित घेतला. त्यानंतर त्याचा विकास करत त्या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित केले. आज ते डौलाने उभे आहे. भाटनगर येथे झोपडपट्टीधारकांना पक्की घरे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संजोग वाघेरे यांनी घेतला.
काळेवाडी येथील पूल त्यांनी मंजूर केला.

शहरातील उद्योगधंदे वाढीस लागले पाहिजे. तेच पुढे जाऊन शहराचा आरसा होतील अशी त्यांची भावना होती. त्यामुळे उद्योगांना अधिकाधिक सूट दिली. जकात, कर, पाणी यामध्ये कंपन्यांना सूट दिली. हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स आणि टेल्को या कंपन्यांसाठी त्यांनी जकातीमध्ये सवलती दिल्या. त्यावेळी या कंपन्या नवीन होत्या. त्यांना बळकटी देण्याचे काम वाघेरे यांनी केले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज या कंपन्या शहरामध्ये मानाने उभ्या आहेत. शहरातील खेळाडूंसाठी पाच कोटी फिक्‍स डिपॉझिट ठेवले. त्यामधून आंतराराष्ट्रीय खेळाडू तयार केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेचा वर्धापनदिन 11 ऑक्‍टोबर रोजी साजरा केला जातो. त्यांच्या काळामध्ये पहिल्यांदा यादिवशी पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये पुणे येथे क्रिकेटचा सामना घेण्यात आला. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक विजयी झाले. त्यावेळी याबाबत संपूर्ण राज्यभर वृत्तपत्रांतून बातम्या झळकल्या होत्या. माजी महापौर संजोग वाघेरे पाटील आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. ते राजकारणात सक्रीय असून शहराचा जास्तीतजास्त विकास करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

त्यादृष्टीने त्यांचे नगरसेवक त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, शहराचा विकास करण्यासाठी अनेक जुन्या माणसांचा हात आहे. निर्मळ मनाने शहराचा फक्त विकास करायचा आहे. शहर झपाट्याने बदलत आहे. त्यासाठी शहराचा विकास होणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.