नगर – शनिवारी शहरातील विविध मंदिरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. पहाटेपासून भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर हनुमान चालिसा पठण, महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारच्या वेळी अनेक मंदिरात अन्नदान आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हनुमान जयंतीनिमित्त शहरातील विविध मंदिरांवर आकर्षक विद्यूत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
सर्जेपूरा येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर, झेंडीगेट जवळील दक्षिणमुखी मंदिर, गांधी मैदान येथील उत्तरमुखी मारुती मंदिर, माळीवाडा वेशीजवळील शनी-मारुती मंदिर बुरुड गल्लीतील श्री काळा मारुती मंदिरासह शहरातील मंदिरात हनुमंत जन्मोत्सवानिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक उपक्रम पार पडले.
सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातही हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त पहाटे हनुमानाच्या मूर्तीला महाभिषेक, हनुमान चालीसा पाठ, रामनामाचा जप व आरती करून विधिवत पूजा करण्यात आली. बरोबर सुर्योदयाच्या वेळी उपस्थित भाविकांनी पुष्पवृष्टी करून संकटमोचन हनुमान की जय, जय श्रीरामच्या जयघोष करत श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केला. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, तर मंदिरा बाहेरही आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. यानिमित्त शहरात सुरु झालेल्या हनुमान चालीसा पाठाचाही उत्साहात सांगता करण्यात आली, अशी माहिती प्रवीण परदेशी यांनी दिली.
माळीवाडा येथील शनी-मारुती मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजता जन्मोत्सवाच्यावेळी श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते अभिषेक करुन महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे सचिव अशोक कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, रंगनाथ फुलसौंदर, पांडूरंग नन्नवरे, प्रा.माणिक विधाते, उद्योजक राम मुलतानी आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसर फुलांसह आकर्षक सजावट करण्यात आली होती.
नगर शहरामध्ये विविध मंडळांनी हनुमान जयंतीनिमित्त विविध मंडळांनी आकर्षक अशा मुर्ती उभारुन जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शहरातील विविध तालिमीमध्ये आकर्षक रोषणाई करुन युवकांनी कावडीने आणलेल्या पाण्याने अभिषेक करण्यात आले. नगर शहरातील स्टेट बॅंक चौक, सर्जेपुरा, दिल्लीगेट, लक्ष्मी कारंजा, माळीवाडा, नेप्तीगेट, झेंडीगेट, नेता सुभाष चौक, नालेगांव, वारुळाचा मारुती, नवग्रह मंदिर, भुतकरवाडी, श्रमिकनगर, पावन हनुमान मंदिर, बालिकाश्रम रोड, खाकीदास बाबा मठ, नित्यसेवा सोसायटी, मार्कंडेय सोसायटी गुलमोहोर रोड, तपोवन, भोसले आखाडा, अरणगांव रोड, रेल्वेस्टेशन, केडगांव, भिंगार येथील रोकडेश्वर मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठीसाठी रांगा लावल्या होत्या. हनुमान जयंतीनिमित्त गेल्या 40 दिवसांपासून नगर शहरात चौका-चौकात हनुमान चालिसा पाठाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ, लक्ष्मीनारायण सत्संग मंडळ, श्री रामभक्त हनुमान सत्संग मंडळ, श्री वीर हनुमान सत्संग मंडळ, शिवगोरख भक्त मंडळ, मंगल भक्त सेवा मंडळ आदि मंडळाने शहरात व उपनगरात हनुमान चालिसाचे पठण करुन भाविकांना मंत्रमुग्ध केले.