कोईम्बतूर: तमिळनाडूच्या कोईम्बतूरच्या रस्त्यावर एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात महिलेचा अर्धनग्न स्थितीतील मृतदेह अविनाशी रोडवर एका कारमधून फेकण्यात आला. चिन्नीयापलायम इथे घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत मृतदेहावरून असंख्य वाहने गेली होती. मृतदेह छिन्नविच्छन्न अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी आणि तिच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथकं तयार केली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या शरीरावरून अनेक वाहनं गेल्यानं तिचा चेहरा ओळखू येत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. रस्त्यावरून जात असलेल्या काहींनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस चिन्नीयापलायम इथे पोहोचले. मात्र तोपर्यंत मृतदेहाची अक्षरश: चाळण झालेली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कोईम्बतूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे. एका फुटेजमध्ये कारमधून मृतदेह रस्त्यावर फेकून देत असल्याचे दृश्य कैद झाले आहे. त्यानंतर त्या मृतदेहावरून दोन वाहने गेली असल्यचे दिसत आहे.
रस्ता ओलांडताना महिलेला अपघात झाला असावा आणि त्यानंतर वाहनं तिच्या शरीरावरून गेली असावीत असा पोलिसांचा प्राथमिक समज होता. मात्र त्यानंतर पोलिसांना हत्येचा संशय आला. मृतदेह अर्धनग्न स्थितीत सापडल्यानं संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली. महिलेचा ऑटोप्सी अहवाल आल्यानंतर हत्येचे नेमके कारण समजू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.