वाघोली – जोरदार वारा, विजेचा कडकडाट, धडकी भरवणारा ढगांचा कडकडाट व धुंवाधार पावसाने वाघोलीत दोन दिवसांपासून सायंकाळी दाणादाण उडवली. वाघोलीच्या सर्वच भागामध्ये पाण्याचे मुसंडा वाहत होता. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या कमानी, बोर्ड तुटले तर अनेक होर्डींग्जच्या फ्लेक्सचे कापड फाटून इतरत्र उडाले. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटनाही घडल्या. पावसाला सुरुवात झाल्यानंतर वाघोली व खराडी भागामध्ये काही वेळ गारांचा पाऊसही झाला होता.
गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळी जोरदार वारे वाहू लागले. यानंतर काही वेळाने पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोरही वाढला. वाऱ्याचे तीव्रता सर्वाधिक होती. दोन्ही दिवशी सायंकाळी पडलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
जोरदार वाऱ्यामुळे रोडला लावलेल्या लोखंडी कमानीही तुटल्या. अनेक ठिकाणचे बोर्ड वाकले होते. विद्युत पोल व मिळेल त्या जागी लावलेल्या फ्लेक्स तुटून पडले. मोठ्या होर्डिंग्जला लावलेल्या फ्लेक्सचे कापड फाटून ते इतरत्र पडले. पावसाने विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. पुणे नगर महामार्गालगत काही ठिकाणी पाणी साचले होते.
महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
बुधवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह वाघोली परिसरात धुंवाधार पाऊस पडल्याने पुणे-नगर महामार्गालगत उबाळेनगर येथे बजाज शोरुमच्या समोरील बाजूस एक होर्डिंग मुख्य रस्त्यावर कोसळले. होर्डिंगच्या खाली एक कार सापडली आहे. इतर ४ ते ५ गाड्यांचे देखील नुकसान झाल्याचे समजते.
कावेरी हॉटेल समोर महामार्गावर आलेले पाणी तसेच होर्डिंग कोसळल्यानंतर महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पीएमआरडीए अग्निशमन दल, लोणीकंद पोलीस यांनी होर्डिंग्ज काढण्यास सुरुवात केली आहे. होर्डिंग्ज कापून हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये जीवितहानी झाली नसून होर्डिंग व त्यांच्या स्ट्रक्चरबाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.