Live Cricket Score, GT vs DC Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 चा 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या 8.5 षटकात 4 गडी गमावताना 92 धावा करत गुजरात टायटन्सचा पराभव केला. आयपीएलच्या इतिहासातील हा दिल्लीचा सर्वात मोठा विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाला केवळ 89 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 67 चेंडूत लक्ष्याचा पाठलाग केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि जॅक फ्रेझर-मॅकगर्क यांच्यात पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी झाली. स्पेन्सर जॉन्सनने संघाला पहिला धक्का दिला. त्यांनी मॅकगर्कची शिकार केली. त्याला दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 20 धावा करता आल्या. तर शॉ केवळ सात धावा करू शकला. या सामन्यात अभिषेक पोरेलने 15, शाई होपने 19, ऋषभ पंतने 16 आणि सुमित कुमारने 9 धावा केल्या. पंत आणि सुमित नाबाद राहिले. गुजरातकडून गोलंदाजीत संदीप वारियरने दोन बळी घेतले. तर स्पेन्सर जॉन्सन आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
Back-to-back wins on the road ✅ pic.twitter.com/2L7IM7kqbF
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 17, 2024
यासह दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा पराभव करत गुणतालिकेत सहावे स्थान मिळविले आहे. आता संघाच्या खात्यात सहा गुणांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर गुजरातचा संघ सातव्या स्थानावर पोहोचला आहे. दोन्ही संघांच्या खात्यात समान गुण आहेत.
IPL 2024 (GT vs DC Match 32) : दिल्लीच्या गोलंदाजांचा अहमदाबादमध्ये कहर, गुजरातचं 89 धावांवर पॅकअप…
तत्पूर्वी, दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक गमावणे गुजरात टायटन्सला महागात पडले. त्यांचा संघ प्रथम खेळताना 17.3 षटकात सर्वबाद केवळ 89 धावा करू शकला आहे. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवले कारण गुजरातने पहिल्या 50 धावांतच 6 विकेट गमावल्या होत्या. गुजरात आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळत होता, पण संघाचे फलंदाज एक धावही काढण्यासाठी धडपडताना दिसले.
इशांत शर्मा आणि मुकेश कुमार यांच्या सलामीच्या स्पेलने गुजरात टायटन्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते. गुजरातसाठी सर्वाधिक धावा राशिद खानने केल्या, ज्याने 24 चेंडूत 31 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स हा फलंदाज आहे, पण त्यानेही एकाच षटकात 2 बळी घेत वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.
गुजरात टायटन्सच्या डावात 8 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. साई सुदर्शनने 12 आणि राहुल तेवतियाने 10 धावांचे योगदान दिले. 15 व्या षटकापर्यंत गुजरात टायटन्सची धावसंख्या 8 गड्यांच्या मोबदल्यात 78 धावा होती. पण रशीद खान भक्कम भिंतीसारखा क्रीजवर उभा राहिला. जोरदार प्रयत्न करूनही रशीद 31 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गुजरातच्या डावात षटकार ठोकणारा रशीद खान हा एकमेव फलंदाज होता. संथ खेळपट्टीवर झुंजणाऱ्या गुजरात टायटन्सचा डाव 18व्या षटकात नूर अहमदला मुकेश कुमारने क्लीन बोल्ड केल्यावर संपुष्टात आला.
दिल्लीची तगडी गोलंदाजी….
आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची खूप धुलाई झाली होती, परंतु गुजरात विरुद्धच्या सामन्यात प्रत्येकजण जबरदस्त फॉर्ममध्ये होता. मुकेश कुमारने 3, इशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्सने 2, तर खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी आपापल्या षटकात प्रत्येकी एक विकेट घेतली. कुलदीप यादवला एकही बळी घेता आला नसला तरी त्याने 4 षटकांत केवळ 16 धावा देऊन गुजरातच्या फलंदाजांना सतत दबावाखाली ठेवले. या तगड्या गोलंदाजीमुळे दिल्लीनं गुजरातला पूर्ण 20 षटकेही खेळू दिली नाहीत. IPL 2024 मध्ये खलील अहमदने आतापर्यंत 2 मेडन षटके टाकली आहेत आणि सर्वाधिक मेडन षटके टाकण्याच्या बाबतीत तो अव्वलस्थानी आला आहे.