पुणे – “स्मार्ट सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या पुण्याच्या बहुतांश भागांत अनधिकृत टपऱ्या, पत्राशेडमुळे बकालपणा वाढवला जात आहे. विशेषतः हडपसर – हांडेवाडी रस्ता परिसरात या अनधिकृत टपऱ्या, पत्राशेड तसेच भंगार दुकानांची संख्या वाढली आहे. बेकायदेशीर अतिक्रमण वाढत असल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. अनधिकृत व्यवसायांमुळे गुंडगिरी आणि हफ्तेखोरी वाढली आहे. त्यामुळे हांडेवाडी रोडवरील या पत्राशेडवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
हडपसर-हांडेवाडी रस्ता तसेच ससाणेनगर-सय्यदनगर आणि महंमदवाडी रस्त्यावर सार्वजनिक मोकळ्या तसेच काही ठिकाणी खासगी जागेत अनधिकृतपणे पत्राशेड उभारण्यात आली आहेत. एखाद्या ठिकाणी व्यावसायिकाने अनधिकृत अतिक्रमण केले, की याची संख्या वाढत जाते. पुढे कारवाई होत नसल्याचे दिसून आले की त्यात अतिक्रमणात अधिकच भर पडते. तेव्हा कारवाई करताना वाद वाढतात. एखादे अतिक्रमण होत असतानाच नागरिक त्याबाबत पालिकेला माहिती देतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि पुढे ही परिस्थिती निर्माण होते.
हडपसर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. त्यात हडपसर- हांडेवाडी रोडवर पत्राशेड उभारून दुकाने थाटली आहेत. येथे श्रीराम चौकात एकीकडे सुशोभीकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च केला जात आहेत, तर त्याच चौक परिसरात रस्त्यांकडेला तसेच रूनवाल सिगल सोसायटी आणि अशोक नगर सोसायटीसमोरील भागात अनधिकृतपणे पत्राशेड उभारली आहेत. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने बकालपणा वाढत आहे.
अतिक्रमण नियंत्रण आणि बांधकाम विभागांत समन्वयाचा अभाव
हडपसर-हांडेवाडी रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, यासाठी यापूर्वी विविध संघटनांनी आंदोलने केली. त्यावेळी केवळ अतिक्रमणाचा फार्स करण्यात आला. पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे वाढली. याविषयी अतिक्रमण विभागातील अधिकारी हे बांधकाम विभागाकडे, तर बांधकाम विभाग अतिक्रमण विभागाकडे बोट दाखवून कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे. त्यामुळे येथील परिस्थितीबाबत शंका निर्माण होत आहे.
कोणत्याही अनधिकृत बांधकामांना थारा दिला जाणार नाही. रस्त्यावर, फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन तसेच सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे उभारलेले सर्व शेड, पक्की बांधकामे तसेच अतिक्रमणे तातडीने काढली जातील.
– माधव जगताप, अतिक्रमण नियंत्रण विभाग प्रमुख, मनपा