मंचर, (प्रतिनिधी) – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील मंदिराकडे जाणारा रस्ता छोटा असून कडेची दुकाने रस्त्यावर आली आहेत. यामुळे भाविकांना रहदारीमध्ये अडचणी येतात. यासाठी महाशिवरात्रीपूर्वी देवस्थान, पोलीस, ग्रामपंचायत यांनी रस्त्यावर आलेली अतिक्रमणे दुकानदारांना सांगून दूर करावित. जर कोणी ऐकत नसेल तर त्याचे अतिक्रमण काढून टाका, असे आदेश उपविभागीय अधिकारी गोविंद शिदे यांनी दिले.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे 8 मार्चला महाशिवरात्र यात्रा आहे. त्यामुळे दि. 7 ते 10 मार्च या दिवशी मोठी गर्दी होणार आहे. या यात्रेचे नियोजन करण्यासाठी घोडेगाव येथे तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी भीमाशंकर देवस्थाचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, तहसीलदार संजय नागटिळक, खेडच्या प्रभारी तहसीलदार नेहा शिंदे, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर,
उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे, रत्नाकर कोडिलकर, उदय गवांदे, उपअभियंता सुरेश पटाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुषार पवार इत्यादी उपस्थित होते. भीमाशंकर मंदिराकडे जाणा-या पायरी मार्गाचे काम सुरू असून हे काम 4 मार्चपर्यंत पूर्ण करून पायरी मार्ग दर्शनासाठी खुला करावा, असे आदेश बांधकाम विभागाला देण्यात आले. तसेच यात्रेयासाठी फिरते स्वच्छता गृह, रूग्णवाहिका, टँकर यांचे नियोजन बैठक करण्यात आले.
यात्रेपूर्वी भीमाशंकरमधील हॉटेलांमध्ये विकले जाणारे खाद्य पदार्थ, पेठे यांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून केली जावी. असे आदेश देण्यात आले. तसेच ग्रामपंचायतींना यात्रा खर्चासाठी शासनाकडून निधी मिळावा अशी मागणी निगडाळे/कोंढवळ व भोरगिरी/भीमाशंकर ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली.
भीमाशंकर देवस्थान मंदिरातील सुशोभिकरण, लायटींग, जनरेटर, फुलांची सजावट, मांडव, शुटिंग, मार्गदर्शक व दिशा दर्शक फलक यांची व्यवस्था करणार आहे. दि. 7 रोजी मध्यरात्री बारा वाजता शासकिय पुजा होवून यात्रेला सुरुवात होईल.
-सुरेश कौदरे, अध्यक्ष भीमाशंकर देवस्थान
घोडेगाव ः येथे श्री क्षेत्र भीमाशंकर यात्रेची पूर्व तयारी बैठक प्रांत अधिकारी गोविंद शिंदे याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.