हडपसर – सय्यदनगर येथील वीस वर्षे जुन्या पाण्याच्या लाईन बदलून नव्या लाईन टाकण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी याभागात नवीन लाईन टाकण्याची मागणी माजी नगरसेवक फारूक इनामदार यांनी केली होती.
सय्यदनगर परीसरात ए बाजूला गल्ली क्रमांक १ ते २८ व बी बाजूला १ ते १५ गल्ली मधील जुन्या पाईप लाईन ५ ते ६ फूट खोल गेल्या असून पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळून येत आहे. या भागात नळाद्वारे येणारे पाणी घाण व दुर्गंधीयुक्त येत आहे. पाणी आल्यानंतर नागरिक सुरवातीला अर्धा तास पाणी भरत नाहीत. अर्धा तास पाणी तसेच सोडून देतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पाणी येत असतानाही केवळ ड्रेनेजचे पाणी मिसळून येत असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही.
“सय्यदनगर येथे ए साईड गल्ली नंबर१ ते २८ व बी साईड गल्ली नंबर १ ते १५ याठिकाणी सध्या असलेल्या पाण्याच्या लाईन सुमारे २० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी त्या खराब झाल्या आहेत. या लाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. तेच पाणी नळातून नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी २४ बाय ७ मधून नवीन पिण्याच्या पाण्याची पाइप लाईन टाकून मिळाव्यात, अशी मागणी महापालिका व पाणी पुरवठा विभागाला केली होती. त्यानुसार आता गल्ली क्रमांक १३ व १५ येथे नवीन लाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे.” – फारुकभाई इनामदार, माजी नगरसेवक