हडपसर – रेल्वे प्रशासनाने कामाच्या निमित्ताने ससाणेनगर- सय्यदनगर रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद केल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. कामाचे निमित्त पुढे करून रेल्वे प्रशासन वारंवार रेल्वेगेट बंद करत आहे. असा आरोप करत रेल्वे गेट वाहतुकीस खुले केले नाहीतर १५ जानेवारीला गेटवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक फारुकभाई इनामदार यांनी दिला आहे.
सय्यदनगर रेल्वे गेट क्रमांक ७ हे कामाच्या निमित्ताने दिनांक ६ ते २० जानेवारी दरम्यान वाहतुकीस पूर्णपणे बंद केले आहे. रेल्वे प्रशासनाने तसे फलक येथे लावले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्ग म्हणून भुयारी मार्ग वापरावा असेही रेल्वे प्रशासनाने सुचवले आहे. दरम्यान सय्यद नगर येथील रेल्वे गेटवर कोणत्याही स्वरूपाचे काम सुरू नसताना रेल्वे प्रशासनाने जाणीवपूर्वक रेल्वे गेट बंद केले आहे, असा आरोप माजी नगरसेवक फारुकभाई इनामदार व येथील नागरिकांनी केला आहे.
इनामदार म्हणाले की प्रत्यक्षात कोणतेही काम रेल्वे गेटवर सुरू नाही.तरीही रेल्वे प्रशासन वारंवार रेल्वे गेट बंद करून नागरिकांना वेठीस धरत आहे. त्यांनी सुचविलेले भुयारी मार्ग हे पर्यायी मार्ग होवूच शकत नाहीत. भुयारी मार्गात अनेक त्रुटी असल्याने वाहतूक सुरळीत राहत नाही शिवाय अपघातही घडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सय्यदनगर रेल्वेगेट क्रमांक ७ हे सुरू ठेवावे अशी मागणी आहे.रेल्वे प्रशासनाने या मागणीचा विचार न केल्यास १५ जानेवारीला नागरिकांच्या समवेत तीव्र आंदोलन छेडू ,असा इशाराही फारुकभाई इनामदार यांनी दिला आहे. दरम्यान इनामदार व काही नागरिकांनी आज सकाळी रेल्वेगेट वर एकत्र येऊन प्रातिनिधिक स्वरूपाचे आंदोलन केले.
दरम्यान याबाबत पुणे रेल्वे मंडळाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कीसय्यदनगर रेल्वे गेटवर कॉक्रीटीकरण व इतर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. ते बरेच दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे रेल्वे गेट बंद ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी भुयारी मार्गाचा वापर करावा.