पुणे – दोघे परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास तयार झाले. मात्र, ती जापान येथे होती. तिला प्रत्यक्ष हजर राहणे शक्य नव्हते. न्यायालयीन पध्दतीनुसार तिने स्वत: अथवा जपान दूतावासासमोर प्रतिज्ञा पत्र केले तरच घटस्फोट मंजुर होणार होता. मात्र, जापान दूतावासाने प्रतिज्ञापत्र तयार करून देण्यास नकार दिला. मात्र, प्रथमच ऍड. सुचित मुंदडा आणि ऍड. शितल बारणे यांनी व्हिसीद्वारे दिलेल्या प्रतिज्ञा पत्रावर व्हिसीद्वारेच नाझरसमोर तिने शपथ घेतल्यानंतर अर्ज मंजुर केला. दोघांचा घटस्फोट मंजुर झाला. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघेही उच्चशिक्षित आहेत. ती सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे. तर जर्मन भाषांतराचे काम तो करतो. पारंपारिक पध्दतीने दोघांचा विवाह 2015 मध्ये झाला. सुरूवातीपासून दोघांमध्ये वाद होता. त्रासाला कंटाळून माधव याने 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यास माधवी उत्तर देत नव्हती. दरम्यान करोनामुळे दोन वर्षे न्यायालयात यावर कोणताही आदेश झाला नाही. याच कालावधीत ती कंपनीमार्फत जपान येथे गेली. त्यामुळे या प्रकरणात आणखी तेढ निर्माण झाली.
दरम्यान माधव याचे वकील ऍड. सुचित मुंदडा आणि ऍड. शितल बारणे यांनी माधवीच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यावेळी केलेली चर्चा आणि ऍड. शितल बारणे यांनी व्हॉट्सअप आणि फोनद्वारे माधवीच्या संपर्कात राहून समझोता घडवून आणला. त्यानंतर परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास ती तयार झाली. मात्र, त्यानंतर तिच्या प्रतिज्ञा पत्राबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे ऍड. मुंदडा आणि ऍड. बारणे यांनी व्हीसीद्वारे नाझर यांना माधवीला पाठविलेल्या प्रतिज्ञापत्राचा अर्ज दिला. तो अर्ज मंजुर करून न्यायालयाने नाझर विजय वैद्य यांना व्हिसीद्वारे शपथ घेऊन प्रतिज्ञापत्र तयार करून त्याचे स्क्रीन शॉट जोडण्यास सांगितले. अर्ज मंजूर केला.