करोना काळात ‘नेसल स्प्रे’ ठरतोय आशेचा किरण…

सर्वत्र करोनाचा कहर वाढू लागलेला असतानाच इंग्लंडहून एक दिलासादायक संशोधन समोर आले आहे. करोना विषाणू विरोधात सध्या मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर व लसीकरण ही शस्त्रे आपल्या हातात आहेत, आता नुकत्याच झालेल्या नवीन संशोधनामुळे आपणास आणखीन एक अस्त्र मिळाले आहे. लंडन येथील बर्मिघम युनिव्हर्सिटीने तयार केलेला नाकाद्वारे घेता येणारा फवारा “सॅनोटाइज अँटीकोविड नेसल स्प्रे’ यामध्ये द्रवरूपी नायट्रिक ऑक्‍साइडचा वापर केला आहे. सॅनोटाइज हे एक नाकाद्वारे घेण्याचे केमिकल सॅनिटायझर आहे. ही करोनावरील लस नव्हे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यतः नाकाद्वारे श्‍वसनसंस्थेवर होत असल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी व नियंत्रणात आणण्यासाठी याचा उपयोग होईल. पहिल्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष नुकतेच जाहीर झालेले आहेत. संशोधकांना असे आढळून आले आहे की, नायट्रिक ऑक्‍साइड स्प्रे नाकाद्वारे दिवसातून दोन ते तीन वेळा वापरल्याने करोनाबाधितांमधील विषाणूंचा प्रभाव 24 तासात 95 टक्‍के व 72 तासांत 99 टक्‍के इतका कमी झाल्याचे आढळून आले आहे. जास्त धोकादायक असणारा यूके व्हेरीयंट करोना व्हायरसवरसुद्धा प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

संशोधक अजून याच्या विविध प्रकारच्या चाचण्या घेत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष अद्याप जाहीर झालेले नाहीत. तरीही अत्यावश्‍यक वापरासाठी व सुरक्षित असल्याने यूके, कॅनडा, न्यूझीलंड, इस्रायल इत्यादी देशांनी याच्या वापरास परवानगी दिली आहे.

नायट्रिक ऑक्‍साइड गॅस स्वरूपात असल्याने त्याच्या वापरावर बंधने येत होती. सॅनोटाइज कंपनीने सूक्ष्म तंत्रज्ञानाचा वापर करून गॅसचे रूपांतर द्रव स्वरूपात विकसित केले आहे. यापुढे मलम अथवा लोशनमध्येसुद्धा उपलब्ध होईल. असे संशोधन म्हणजे मोठा विजय व क्रांतिकारी बाब आहे.
नवीन द्रवरूपी नायट्रिक ऑक्‍साइड स्प्रेमुळे श्‍वसन मार्गातील करोनाव्हायरस मारून टाकण्याचे कार्य होते. तसेच नाकातील, घशातील विषाणूंवर आवरण तयार झाल्याने त्यांना रोखणे व पुढे संक्रमण होऊ न देणे हे कार्य होते. स्प्रे मुळे करोना विषाणूला पेशीमध्ये शिरण्यासाठी असणारे रिसेप्टरस बंद करण्याचे कार्य होते. परिणामतः करोना संक्रमण व प्रादुर्भाव कमी होतो.

म्हणून हा वरच्या श्‍वसन मार्गाचा जंतूनाशक (सॅनिटायझर) म्हटले तर वावगे ठरणार नाही.
नायट्रिक ऑक्‍साइड गॅस निसर्गतः आपल्या शरीरात पेशींच्यामार्फत सूक्ष्म स्वरूपात तयार होत असतो. शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यासाठी याचा उपयोग होतो. सर्व प्रकारचे बॅक्‍टेरिया, व्हायरस, फंगस, यांचा नायनाट करणे, रक्‍तदाब नियंत्रण, रक्‍तवाहिन्या शिथिल करणे, जखम भरणे, दाहरोधक, रोग प्रतिकारशक्‍ती अशी अनेक कामे यामुळे होतात.

लहान बाळांमधील पल्मोलरी हायपरटेन्शन, ब्ल्यू बेबी सिंड्रोम अशा गंभीर स्वरूपाच्या आजारांमध्ये हायप्रेशर ऑक्‍सिजनमधून श्‍वासावाटे दिल्याने “नायट्रिक ऑक्‍साइड वायू अत्यंत प्रभावीपणे कार्य करतो असे बालरोग तज्ञांना आढळले आहे.

काही काळात उपलब्ध होणाऱ्या बहुगुणी “द्रवरूपी नायट्रिक ऑक्‍साइडचा’ उपयोग करोना विषाणू प्रतिबंधक, व्हायरल लोड, आजाराची तीव्रता, फैलाव कमी करण्यासाठी होतो. तसेच अनेक आजारांवर ही प्रभावी आहे. पुढील काळात यात विविध आजारांवर याचा वापर होणार, हे नक्‍की. सॅनोटाइज द्रवरूप असल्याने सहज हाताळणी, स्वस्त, सुरक्षित, प्रभावी, वाहतुकीसाठी सोपे म्हणून भविष्यात याचा मोठ्या प्रमाणात वापर होईल. भारतामध्येसुद्धा अशा प्रकारचे औषध उपलब्ध व विकसित करण्याचे प्रयत्न सुरू होतील.

– डॉ. संजय पंतबाळेकुंद्री

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.