नगर – राज्यात बंदी असतानाही गुटखा व माव्याची नगर जिल्ह्यात खुलेआम विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. कोतवाली पोलिसांनी छापा टाकून एमआयडीसी परिसरातील गोडावूनमधून 1 कोटी 6 लाखाच्या गुटख्यासह सुंगधित तंबाखू व गाड्या जप्त केल्या. याप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. यातील गोडावूनचा मालक फरार आहे. हा गुटखा नगरमध्ये तयार केला जाते की, परराज्यातून आणून त्याची जिल्ह्यात विक्री केली जाते, याचा तपास पोलिस करत आहे.
शहरातील मार्केटयार्ड परिसरात दोन जण हे एका दुचाकीवर गुटखा व सुगंधी सुपारीजन्य पदार्थ विक्री करण्याकामी आले आहेत, अशी माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली. त्यांच्या आदेशावरून पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी कर्मचाऱ्यांसह छापा टाकला असता राकेशकुमारा जगदंबप्रसाद मिश्रा (वय 42, एमआयडीसी, नगर) व अभिजित गोविंद लाटे (वय 34, रा. पाईपलाईन रोड) यांना गुटखा विकताना पकडले. त्यांनी एमआयडीसी येथे गुटख्याचे गोडावून असून, तेथूनच सगळा माल विक्री करीता वितरीत केला जाता असल्याचे सांगितले.
पोलीस पथकाने एमआयडीसी परिसरातील बोल्हेगाव परिसरात राहणाऱ्या रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे यांचे शेती गट क्रं 65/5 गटमध्ये एका पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकला. या ठिकाणी गुटख्याचे पाकीटे मोजताना 10 जण मिळून आले. राहुल कलासनाथ सिंग (वय 24 रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) अझर शकील शेख (वय 39 रा. दावल मालिक चौक, बोल्हेगाव), चंद्रकेश शोभनाथ तिवारी (वय 50 रा. उत्तर प्रदेश), शिवप्रकाश रामकुमार तिवारी (वय 48 रा. रामडिडीया उत्तर प्रदेश), मोहसिन शब्बीर पटेल (वय 36, बोल्हेगाव नवनाथनगर), अर्जुन शंकर यादव (वय 46, वरळी कोळीवाडा वारसलेन, मुंबई), नितीन सुनिल साठे (वय 32 रा. सनफार्मा शाळेजवळ, बोल्हेगाव), शादाब शब्बीर पटेल (वय 29 बोल्हेगाव, नवनाथ नगर) यांना पोलिसांनी अट केली. पत्र्याच्या गोडाऊन शेडचा मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे हा फरार झाला.
पोलिसांनी या ठिकाणाहून 97 लाख 93 हजार 920 रुपयांचा गुटखा व विविध कंपनीचा गुटखा, 3 लाख 62 हजार 800 रुपये कंपनीची सुगंधित तंबाखू, 2 लाख 35 हजार रुपये किंमतीचे विविध कंपनीचे मोबाईल फोन, 2 लाखाच्या 4 दुचाकी गाड्या, 32 हजाराची रोकड असा 1 कोटी 6 लाख 23 हजार 720 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेत आरोपीला अटक केली. कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे व गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे, पोलिस नाईक गणेश धोत्रे, नितीन शिंदे, सलिम शेख, संतोष गोमसाळे, सागर पालवे, राजु शेख, अभय कदम, दीपक रोहकले, अमोल गाडे, सोमनाथ राउत, अतुल काजळे, दीपक साबळे, सतीश भांड, राहुल गवळी, संदीप थोरात, राहुल गुंडु यांनी केली.
दैनिक प्रभातने वेधले होते लक्ष
गुटखा व मावा विक्रीला बंदी असताना जिल्ह्यात खुलेआमपणे दुकाने, टपऱ्यांतून गुटखा व माव्याची विक्री होत आहे. यामुळे तरुण पिढी बर्बाद होत चालली आहे. यासंदर्भात दैनिक प्रभातने वृत्तमालिका प्रसिद्ध करून गुटखा व माव्याचा काळाबाजार कसा चालतो, याबाबत सडेतोड लिखाण केले होते. त्यानंतर पोलिस व अन्न औषध विभागाकडून कारवाई करण्यात आली. मात्र, पोलिस मुळापर्यंत जात नसल्याने तस्करांचे फावत आहे.