गांधीनगर – अहमदाबाद गुन्हे शाखेने गुरुवारी गुजरातचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी यांना दूधसागर अध्यक्षपदाच्या काळात झालेल्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी अटक केली. त्यांचे सीए शैलेश पारीख यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दूधसागर डेअरीत झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी या दोघांविरुद्ध मेहसाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दाखल करण्यात आली होती.
आता लवकरच पोलीस विपुल चौधरी आणि त्यांच्या पीएला एसीबीच्या ताब्यात देणार असल्याची माहिती समोर आली आहे. विपुल चौधरी हे दूधसागर डेअरीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळून आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दूधसागर डेअरीच्या 300 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी केली. तपासादरम्यान 300 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. विपुल यांची पत्नी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध आयपीसी कलम आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआरही नोंदवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.