वडोदरा – लोकसभा निवडणुकीच्या अगोदर गुजरात मधील भारतीय जनता पक्षाचे आमदार केतन इनामदार यांनी मंगळवारी राज्य विधानसभेचा राजीनामा दिला आहे. आपण आतल्या मनाचा आवाज ऐकून ही आमदारकी सोडली आहे. हे दबाव तंत्र नाही पण स्वाभीमानासाठी आपण राजीनामा दिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Gujarat BJP MLA Ketan Inamdar resigns)
आगामी लोकसभा निवडणुकीत वडोदरा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रंजन भट्ट यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी आपण काम करू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वडोदरा जिल्ह्यातील सावली मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या इनामदार यांनी विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. पत्रकारांशी बोलताना पक्षाने भाजपच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची खदखदही त्यांनी व्यक्त केली.
आपला आतला आवाज ऐकून राजीनामा देत असल्याचे इनामदार यांनी पत्रात म्हटले आहे. तत्पूर्वी, जानेवारी २०२० मध्ये त्यांनी आमदारकीचा राजीनामा जाहीर केला होता, परंतु तो सभापतींनी स्वीकारला नव्हता. मंगळवारी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना इनामदार म्हणाले की, ही दबावाची खेळी नाही. बऱ्याच काळापासून, मला असे वाटले की पक्षाने लहान आणि जुन्या कार्यकर्त्यांची काळजी घेतली नाही.
मी नेतृत्वाला याची माहिती दिली आहे,असे ते म्हणाले. मी २०२० मध्ये म्हटल्याप्रमाणे स्वाभिमानापेक्षा मोठे काहीही नाही. आणि हा आवाज एकट्या केतन इनामदारचा नाही तर पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. मी याआधीही म्हटले आहे की, जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करू नये. आमचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार रंजन भट्ट सर्वात मोठ्या फरकाने विजयी व्हावेत यासाठी मी रात्रंदिवस काम करेन. पण हा राजीनामा माझ्या आतल्या आवाजाचा परिणाम आहे, असेही ते पुढे म्हणाले.
इनामदार यांनी २०२० मध्ये राजीनामा दिल्यानंतर, त्यांनी असा दावा केला होता की वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मंत्री त्यांच्याकडे आणि त्यांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत आहेत आणि भाजप पक्षातील अनेक आमदारांनाही अशा कार्यपद्धतीमुळे नैराश्य आले आहे. २०१२ ची विधानसभा निवडणूक त्यांनी पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून जिंकली. नंतर ते भाजपमध्ये सामील झाले आणि २०१७ आणि २०२२ च्या निवडणुकीत दोनदा विजयी झाले. गुजरातमधील सर्व २६ लोकसभा जागांसाठी एकाच टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.