महिला व बाल कल्याण विभागाने दिले आदेश
जळोची- शासन स्तरावर राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अतितीव्र कुपोषित मुले शोधणे व नियमित बालकांचे वजन, उंची घेण्यासाठी ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ केले जाते. मात्र लॉकडाउनच्या काळात राज्यातील नवीन अतितीव्र कुपोषित बालकांचा शोध घेणे शक्य झाले नाही. यासाठी सद्यस्थिती सर्वच अंगणवाडी केंद्रातील बालकांचे ‘ग्रोथ मॉनिटरिंग’ सुरू करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत.
कोरोना सारख्या जीवघेण्या संसर्गजन्य आजारामुळे राज्यातील सर्वच अंगणवाड्या बंद होत्या. अंगणवाड्या बंद असल्यामुळे सामान्य व दुर्गम, अतिदुर्गम भागातील कुपोषित बालकांच्या नोंदी घेणेे शक्य झाले नाही. मात्र आता अंगणवाड्या नियमित सुरू होणार असल्याने कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांच्या शारीरिक विकासात वाढ होण्यास मदत होणार आहे.
महिला व बालविकास विभागाच्या प्राप्त आदेशानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नियमित स्वरूपात अंगणवाडी केंद्र उघडावे. अंगणवाडी केंद्रात मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे तसेच अंगणवाडी केंद्राचे कामकाज करीत असताना सामाजिक अंतर ठेवण्यात यावे. तसेच ज्या लाभार्थ्यांना सर्दी खोकला व तापाची लक्षणे असतील अशांना अंगणवाडी केंद्रात बोलवू नये. रेड झोन व कंटेनमेंट झोन मध्ये गृह भेटी देऊ नये. अंगणवाडीत झालेल्या कामकाजाची नोंद कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये दैनंदिन स्वरूपात घेण्यात यावी. तसेच पूर्व शालेय शिक्षण संदर्भात आयुक्तालयामार्फत यापूर्वी देण्यात आलेल्या निर्देशानुसार पालकांच्या व्हाट्सॲप ग्रुपद्वारे कार्यक्रम घेण्याची कारवाई करावी.
एका दिवसात पाच मुलांना किंवा गरोदर माता यांना वजन व उंची घेण्यासाठी बोलावण्यात यावे. सर्व बालकांची वजन-उंची दर महा घेण्यात येऊन. त्यांची नोंद घेण्यात यावी. अंगणवाडी सेविकांनी नवजात बालकांसाठी वजन घेण्यासाठी वापरण्यात येणारे वजन काटे वापरासंदर्भात झोळीसाठी आवश्यक असलेला कपडा पालकांनी घरूनच आणावा अशा सूचना कराव्यात. असे आदेश अंगणवाडी केंद्रांना देण्यात आले आहेत.
शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करून बारामतीतील अंगणवाड्यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांना साधारण श्रेणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
कल्पना काळे- बालविकास प्रकल्प अधिकारी. बारामती (प्रकल्प २)