नवी दिल्ली – देशभरातील अनेक ठिकाणचे भूजल दूषित ( Groundwater is contaminated ) होत असल्याचा इशारा एका संसदीय समितीने आपल्या अहवालात केंद्र सरकारला ( Central gov ) दिला आहे. अनेक राज्यांतील जमिनी खालच्या पाण्यात आर्सेनिक, फ्लोराईड आणि इतर जड धातूंचा अंश आढळून आला आहे आणि हे घातक जलप्रदुषण ( Water pollution ) आहे असे या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. राज्यसभा खासदार विवेक ठाकूर ( MP Vivek thakur ) यांच्या अध्यक्षतेखालील शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडा विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने आपल्या ३५८व्या अहवालात ही समस्या निदर्शनास आणून दिली. १३ डिसेंबर रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल ठेवण्यात आला आहे. ( Parliamentary committee warned government )
१० पानांच्या अहवालात, समितीने या पाण्यामध्ये आर्सेनिक, फ्लोराईड आणि इतर जड धातूंचा अंश आढळून आल्याचे म्हटले आहे. त्याखेरीज अन्यही दूषित घटक यात आढळून आले आहेत. हे दूषित पाणी कर्करोग, त्वचा रोग, यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत आहे. प्रभावित प्रदेश आणि राज्यांमधील रहिवाशांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. याव्यतिरिक्त, समितीने नमूद केले की या बाधित भागात आर्सेनिक, फ्लोराईड आणि इतर जड धातूंचे निर्मूलन करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.समितीने जोरदार शिफारस केली आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, आरोग्य संशोधन विभाग आणि उच्च शिक्षण विभाग, यांनी पाण्यातील दूषित घटक नष्ट करण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक संशोधन उपक्रमांना प्राधान्य द्यावे आणि या कामासाठी केंद्राने निधी द्यावा.
समितीने अहवालात म्हटले आहे की, प्रभावी सांडपाणी व्यवस्थापन आणि क्षारयुक्त पाणी उपचार पद्धतींसाठी शाश्वत, नाविन्यपूर्ण उपायांसाठी मार्ग शोधण्याची गरजही आहे. अहवाल तयार करताना समितीने उच्च शिक्षण विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग, नॅशनल रिसर्च फाउंडेशन, आयसीएमआर या विभागांच्या प्रतिनिधींची मते ऐकली. या खेरीज देशातील विविध संशोधन संस्थांच्या प्रतिनिधींशीही या प्रकरणी चर्चा करण्यात आली आहे.
समितीने १२ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत या अहवालावर विचार केला गेला असून तो स्वीकारण्यात आला आहे. समितीने अहवालात केलेली निरीक्षणे आणि शिफारशी सरकारने विचारात घेतल्या आहेत अशी माहिती सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.