नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज आरोग्य विभागाशी संबंधित संसदीय समितीला करोना लसीच्या वितरणाबाबत सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली.
आयसीएमआरचे वैद्यकीय महासंचालक आणि आरोग्य सचिवांनी या समितीला लसीच्या वितरणाचा आणि लस विकसित करण्याच्या प्रक्रियेचा तपशील समजावून सांगितला.
समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव हे या समितीचे अध्यक्ष आहेत. देशात 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाच्या कामाचा प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी ही लस देशाच्या विविध भागात पोहोचवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाशी संबंधित संसदीय समितीने याचा सारा तपशील आज झालेल्या बैठकीत जाणून घेतला. भारतात दोन कंपन्यांनी तयार केलेल्या लसी पुरवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना या लसीचे डोस दिले जाणार आहेत.