जयपूर – राजस्थानमधील खासदार हनुमान बेनीवाल यांनी शनिवारी संसदीय समित्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचलले. बेनीवाल यांचा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष भाजपचा मित्रपक्ष आहे.
बेनीवाल हे तीन संसदीय समित्यांचे सदस्य होते. त्या सर्व समित्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे पाठवला. बेनीवाल प्रारंभापासून शेतकरी आंदोलनाचे समर्थन करत आहेत. शेतकऱ्यांचा विरोध असणारे केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची मागणीही ते वारंवार करत आहेत.
आता त्यांनी आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचे सूचित होत आहे. त्यांनी 26 डिसेंबरला तब्बल 2 लाख शेतकऱ्यांसमवेत दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. त्यादिवशीच भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत (एनडीए) राहायचे की नाही याचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
याआधी कृषी कायद्यांना विरोध दर्शवत शिरोमणी अकाली दल (एसएडी) एनडीएमधून बाहेर पडला. आता कृषी कायद्यांवरून एनडीएशी फारकत घेणारा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष दुसरा घटक ठरण्याची शक्यता बळावली आहे.