लंडन – ब्रिटनच्या संसदीय समितीने देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात धक्कादायक अहवाल जारी केला आहे. ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चीन हा मोठा धोका असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार ब्रिटनवर आक्रमकपणे निशाणा साधण्यात चीन आतापर्यंत यशस्वी ठरला आहे, कारण या धोक्याचा सामना करण्यासाठी सरकारकडून कोणतेही चांगले धोरण आखलेले नाही.
संसदेच्या गुप्तचर आणि सुरक्षा समितीच्या या अहवालावर ब्रिटनच्या माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. या अहवालात ब्रिटीश सरकार हे मुद्दे ओळखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात चीनने धुमाकूळ घातल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटले होते की, त्यांचे सरकार ब्रिटनचे चिनी तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. मात्र, त्यांनी चीनशी खुले संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. या कंझर्व्हेटिव्ह सरकारवर टीका करताना अहवालात म्हटले आहे की, चीनचा आकार, क्षमता यामुळे युनायटेड किंग्डमच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करण्यास चीनला सक्षम केले आहे. चीनचा हा धोका रोखण्यासाठी सरकारने उचललेली पावले अपुरी असल्याचे त्यात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय व्यापारातील चीनचा सहभाग आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेप शोधणे फार कठीण आहे. ब्रिटन सरकारने यापूर्वी अशा गोष्टींकडे लक्षही दिले नव्हते. ब्रिटनच्या गुप्तचर संस्था चीनच्या छुप्या कारवायांवर लक्ष ठेवतात, असे मानले जाते. पण चीनने उचललेली पावले ओळखण्याची जबाबदारीही त्यांना घेता आली नाही.
यामध्ये चीनने ब्रिटनमध्ये केलेल्या गुंतवणुकीबाबत अनेक महत्त्वाचे वास्तवही मांडण्यात आले आहे. आतापर्यंत चिनी गुंतवणुकीची चौकशी झाली नसल्याचे सांगण्यात आले. महत्त्वाच्या क्षेत्रात चीनसोबत झालेल्या संवेदनशील गुंतवणूक करारांची फेरतपासणी करण्याचीही सरकारची इच्छा नसल्याचे समितीला आढळून आले आहे. चीनच्या या कृत्यांकडे काही शैक्षणिक संस्थाही दुर्लक्ष करत आहेत आणि त्यांचे पैसे घेण्यात धन्यता मानत आहेत.