नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय कीर्तीची स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे ट्विट केल्याच्या दुसऱ्याच दिवशी तिच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी आज एफआयआर दाखल केली. समाजामध्ये तेढ पसरवणे आणि गुन्हेगारी कारस्थानाचे आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर ग्रेटाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून याबाबत ट्विट करताना ग्रेटा लिहते, ‘मी आताही शेतकरी आंदोलकांच्या बाजूने उभी आहे. कितीही द्वेषभावना, धमक्या अथवा मानवाधिकारांचे उल्लंघन माझी भूमिका बदलू शकणार नाही.” ट्विटमध्ये ग्रेटाने #StandWithFarmers आणि #FarmerProtest हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
I still #StandWithFarmers and support their peaceful protest.
No amount of hate, threats or violations of human rights will ever change that. #FarmersProtest— Greta Thunberg (@GretaThunberg) February 4, 2021
तत्पूर्वी, ग्रेटा थनबर्ग आणि पॉप स्टार रिहानाने सोशल मीडियावरून शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटची दखल देशभरातील सेलिब्रिटींनी घेतली होती. परराष्ट्र मंत्रालयानेही तिच्या ट्विटची दखल घेतली होती. अशाप्रकारे सेलिब्रिटीजनी सोशल मीडियावरून वक्तव्य करणे योग्य नाही आणि ही वक्तव्ये जबाबदारही नाहीत, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने या ट्विटला प्रत्युत्तर दिले होते.
भारतीय संसदेने पूर्ण चर्चेने आणि सर्वसमावेशक विचारांनंतरच कृषी क्षेत्रातील सुधारणांबाबतचे कायदे मंजूर केले आहेत. या सुधारणांमुळे कृषी मालाला व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. या कायद्यांमुळे आर्थिक आणि पर्यावरणपूरक शेतीव्यवसायाला चालना मिळणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसक निदर्शने झाल्याने इंटरनेट सेवा खंडीत केल्याच्या वृत्ताला टॅग करून ग्रेटा थनबर्गने या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे ट्विट केले होते. तसेच इतरांनाही मदतीचे आवाहन केले होते. तिने या आंदोलनाला सहाय्य करू इच्छिणाऱ्यांसाठी काही पर्यायही दिले होते. त्यामध्ये या आंदोलनाला समर्थन देऊ इच्छिणाऱ्यांनी ट्विटरवरून समर्थन देणे, जगभरातील देशांमधील भारतीय दूतावासासमोर निदर्शने करणे आदी पर्याय सुचवण्यात आले होते.
ग्रेटा थनबर्गच्या ट्विटवर खूप उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ग्रेटा बालिका असून तिची प्रतिक्रिया अजाणतेपणातून दिली गेली असल्याचे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे. तर देशात विभाजन करण्याचा विदेशातून कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ नये, अशा शब्दांत अभिनेता अक्षयकुमार आणि अजय देवगण यांनी तिला सुनावले आहे.