भूसुरुंग शोधून काढणाऱ्या उंदराचा सत्कार

Madhuvan

फोम पेन्ह (कंबोडिया)- भूसुरुंग आणि स्फोटके शोधण्याची कामगिरी बजावणाऱ्या मोगवा नावाच्या एका उंदराला ब्रिटनमधील “पीपल्स डिस्पेन्सरी फॉर सीक ऍनिमल्स’ या पशूप्रेमी संघटनेने सुवर्णपदकाने गौरवण्ले आहे. जीव वाचवण्याचे धारिष्ट्य आणि त्यागाच्या कामगिरीची दखल घेऊन या उंदराचा सन्मान करण्यात आला आहे. मागवा हा आफ्रिकन प्रजातीतील मोठा उंदिर आहे. या उंदराने गेल्या 7 वर्षात आतापर्यंत 39 भूसुरुंग आणि 28 स्फोट न झालेली स्फोटके शोधून काढली आहेत, असे या संस्थेने म्हटले आहे.

सर्व साधारणपणे सर्वसामान्य नागरिकांसारखा पुरस्कार एखाद्या उंदराला दिले जाण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. याशिवाय पशूंसाठीच्या शौर्य पुरस्कारांच्या इतिहासामध्येही उंदराने पहिल्यांदाच हा पुरस्कार पटकावला आहे. कंबोडियातील स्फोट न झालेल्या जिवंत भूसुरुंगांचा शोध घेतल्याबद्दल या उंदराला हा गौरव दिला गेला आहे.

“पीडीएसए’ची स्थापना 1917 साली करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून प्राणी-पक्ष्यांवरील उपचाराचे काम केले जात होते. मात्र प्राणी-पक्ष्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन 1943 सालापासून त्यांचा सन्मान करण्यास सुरुवात झाली.

मागवाला बेल्जियन संस्थेकडून स्फोटके शोधण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते. “अपोपो’ या कार्यक्रमांतर्गत कंबोडिया, अंगोला, झिम्बाब्वे आणि मोझांबिकमध्ये युद्ध आणि संघर्षाच्यावेळी मागे राहिलेले कोट्यावधी भुसुरुंग शोधून काढण्याचे प्रशिक्षण उंदरांना दिले गेले. मागवा या उंदराने सर्वाधिक 1 लाख 41 हजार चौरस मीटरचा भूभाग सुरूंग विरहीत केला.

मागवाला मिळालेले सुवर्णपदक हे उंदरांना प्रशिक्षण देणाऱ्यांचाच सन्मान आहे, असे “अपोपो’चे मुख्य कार्यकारी ख्रिस्तोफ कॉक्‍स यांनी म्हटले आहे.

युद्धांमधील सुरुंग आणि बॉम्बमुळे वर्षभरात 7 हजार लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अशा शेकडो जणांना वाचवण्याचे काम मागवामुळे शक्‍य झाले आहे. मागवाच्या पूर्वी “पीडीएसए’चा हा पुरस्कार श्‍वानांना मिळाला होता. 1943 मध्ये हे पदक देण्यास सुरुवात झाली तेव्हापासून 34 श्‍वान, 32 कबूतर, चार घोडे आणि एक मांजर यांना हे पदक देण्यात आले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.