पुणे – शहराचा ‘कॉंटॅक्ट ट्रेसिंग’ दर प्रति करोना रुग्णामागे वाढविण्याचे आदेश केंद्राने राज्य सरकारला दिले आहेत. “कॉंटॅक्ट ट्रेसिंग’ म्हणजे एखादा करोना बाधित आढळल्यास तो ज्या-ज्या नागरिकांना यापूर्वी भेटला आहे, अशांचा माग काढून त्यांच्यापर्यंत पोहोचणे. पुढे या व्यक्तींच्या चाचण्या केल्या जातात. परंतु, प्रत्येक करोना बाधित आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील सरासरी फक्त 10 नागरिकांपर्यंतच यंत्रणा पोहचत असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, “कॉंटॅक्ट ट्रेसिंग’चा महाराष्ट्रातील दर 19 एवढा असून पुण्याचा दर सर्वांत कमी म्हणजेच 10 असल्याची माहिती समोर आली. एखाद्या करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कमीतकमी 20 लोकांपर्यंत तरी पोहोचत, त्यांची करोना चाचणी घ्यायला हवी, असे स्पष्ट आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत.
जाणकारांच्या मते लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर करोनाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे “कॉंटॅक्ट ट्रेसिंग’ अडचणीचे झाले आहे. तसेच अनेक जण बाहेरगावी जात असल्याने “कॉंटॅक्ट ट्रेसिंग’ला मर्यादा येत आहेत.
काही ठिकाणचा कॉंटॅक्ट ट्रेसिंगचा दर- (प्रति करोना रुग्ण)
पुणे ग्रामीण- 1: 13
पुणे शहर- 1: 10
पिंपरी-चिंचवड- 1: 13
सातारा- 1: 8
सोलापूर-1: 11
नंदुरबार- 1: 4
उस्मानाबाद- 1: 4.5
बीड- 1: 22
गडचिरोली- 1: 22