डॉ. मेघश्री दळवी
रोबोट म्हणजे एक यांत्रिक मूर्ती. तर ग्रीन म्हटल्यावर डोळ्यासमोर उभा राहतो निसर्ग आणि त्यातली सजीवसृष्टी. आज ग्रीन या शब्दाचा दुसरा अर्थ आहे पर्यावरणस्नेही आणि पर्यावरणपूरक. पण रोबोट्स तर ऊर्जा वापरून प्रदूषण आणि कार्बन डायऑक्साइड वाढवणारे. यांची सांगड कशी घालणार? पण या दोन गोष्टींचा अद्भुत संगम करणारी रोबोटिक्स मधली ही नवी शाखा आता चांगल्यापैकी स्थिरावत आहे.
ग्रीन रोबोट्स म्हणजे पर्यावरणाचा नाश करण्याऐवजी पर्यावरणाला मदत करणारे, त्याचं संवर्धन करायला हातभार लावणारे रोबोट्स. कधी ते थेट पर्यावरणाशी संबंधित काम करत असतात, तर कधी पर्यावरणविनाशी प्रक्रियेची जागा घेऊन अप्रत्यक्षपणे मदत करत असतात. काही वेळा ते शेती व्यवसायात काम करून उत्पादन वाढवण्यात योगदान देतात, तर काही वेळा निरनिराळ्या आधुनिक आणि कार्यक्षम प्रक्रियांद्वारे अन्नउत्पादनाचा कार्बन फूटप्रिंट कमी करत असतात.
अमेरिकेतल्या एमआयटीने (मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) केलेल्या एका पाहणीनुसार स्वयंचलित रोबोट ट्रक्स वापरून मालवाहतूक अशी ग्रीन करता येईल. हे स्वयंचलित ट्रक्स वेग सतत कमीजास्त न करता शक्य तितक्या स्थिर आणि योग्य वेगात जातात. त्यामुळे सुमारे वीस टक्के इंधनबचत होऊ शकते. जागतिक पातळीवर एकूण जो इंधन वापर होतो, त्यापैकी एक षष्ठांश वापर हा वाहतुकीवर होतो, त्यामुळे त्यातली वीस टक्के घट नक्कीच महत्त्वाची आहे. माणसांसाठी लागणारी वायुवीजन किंवा तापमान कमी-जास्त करता येणारी यंत्रणा अशा रोबोट ट्रक्सना लागत नाही. तर स्थिर तापमान ठेवून ते प्रवास पार पडू शकतात. त्यामुळे मालवाहतुकीचा कार्बन फूटप्रिंट आणखी घटू शकतो. रोबोट्सचा वापर माणसांच्या तुलनेत ग्रीन ठरेल अशी अनेक उदाहरणं आता पुढे येत आहेत.
दुसरीकडे शेतीत ग्रीन रोबोट्सचा वापर अनेक दृष्टींनी फायदेशीर दिसत आहे. तणनाशकांचा अति वापर आणि त्यामुळे होणारं भूजलाचं प्रदूषण हा धोका वाढत असताना त्याजागी रोबोट्सचा वापर करण्याची कल्पना मूळ धरू लागली आहे. अचूक मोजमापन करून तणनाशकांचा आवश्यक तेवढाच फवारा करणारे रोबोट्स उपलब्ध आहेत. काही रोबोट्स एआयच्या सहाय्याने तण अचूक ओळखतात आणि लेसर वापरून ते नष्ट करतात. तर काही रोबोट्स तण उपटून काढून ते खतासाठी नेऊन टाकतात. हे काम ते माणसाच्या कित्येक पट वेगाने करू शकतात हे वेगळं सांगायला नको!
नांगरणी, पेरणी, फळं खुडण्यायोग्य झाली की मगच काढणे, कीड पडते आहे का यावर सतत लक्ष ठेवणे, पशुपालन अशा कामांमध्येही रोबोट्सचा सहभाग वाढतो आहे. एआय आणि वेग यामुळे त्यांची कार्यक्षमता प्रचंड असते. उत्पादनाची हमी, श्रम कमी आणि सोबत पर्यावरणाचंही जतन या तिहेरी फायद्यांमुळे ग्रीन रोबोट्सचा वापर वाढत जाणार हे नक्की!