चंदीगड – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान शनिवारी राज्यातील लोकांसाठी 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे, राज्य सरकारच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पंजाबमधील भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारला उद्या एक महिना पूर्ण होणार आहे त्यानिमीत्त ही घोषणा केली जाणार आहे असे सांगण्यात येते.
गुरुवारी जालंधरमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान मान म्हणाले की, 16 तारखेला आम्ही पंजाबच्या जनतेला एक मोठी खुशखबर देऊ. पंजाबमध्ये 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या योजनेवर चर्चा करण्यासाठी मान यांनी मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. राज्यातील जनतेला 300 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन आम आदमी पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. राज्यातील जनतेला घरपोच रेशन देण्याचा निर्णय राज्य सरकारने या आधीच घेतला आहे.