सूरत – गुजरात कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी गुरुवारी पक्ष सोडण्याच्या अफवांचे खंडन केले आहे. त्यांनी आज येथे बोलताना सांगितले की, मी कॉंग्रेस सोडत असल्याची अफवा आहे, ती कोण पसरवत आहे हे मला माहीत नाही.
आज येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले,की मी आजपर्यंत कॉंग्रेसला माझे 100 टक्के योगदान दिले आहे, आणि येत्या काळातही देईन. आम्ही गुजरातमध्ये अधिक चांगला विकास करू. पक्षांतर्गत लहान-मोठी भांडणे आणि आरोप-प्रत्यारोप होतील, पण आमच्याकडे समजूतदारपणा आहे.
गुजरातला एक चांगले राज्य बनवणे हा आमचा उद्देश आहे, त्यासाठी आम्ही एकत्र काम करू अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. पटेल पुढे म्हणाले, सत्य बोलणे हा गुन्हा असेल तर मला दोषी समजा. गुजरातच्या जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
गेले काही दिवस ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते व त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यामुळे ते कॉंग्रेस सोडणार असल्याचे सांगितले जात होते.