गेल्या वर्षीच्या तुलनेत मिळतोय कमी भाव
गावरान सीताफळाचा हंगाम लांबल्याचा आणि गोल्डनची आवक वाढल्याचा परिणाम
पुणे – सोनेरी रंगाचे, अधिक काळ टिकणारे, कमी गोड अशा “गोल्डन’ सीताफळाची आवक मार्केटयार्डात वाढली आहे. रविवारी मार्केटयार्डातील फळ विभागात तब्बल 12 ते 15 टन या सीताफळाची आवक झाली. या सीताफळास घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार 40 ते 120 रुपये भाव मिळत आहे. गेल्यावर्षी या कालावधीत या सीताफळाला 100 ते 180 रुपये भाव मिळत होता. मात्र, यावर्षी लांबलेल्या पावसामुळे गावरान सीताफळाचा हंगाम लांबला आहे. त्यातच गोल्डन सिताफळाची लागवड वाढली आहे. त्यामुळे आवक जास्त होत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी मिळत असल्याची माहिती व्यापारी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.
साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी गोल्डन सीताफळाचा हंगाम असतो. काही दिवसांपासून या सीताफळाची तुरळक आवक होत होती. ती आता वाढली आहे. सोलापूर, बार्शी, बीड, नगर भागांतून आणि अल्प प्रमाणात पुणे जिल्ह्यातून आवक होत आहे. हे फळ गावरान सीताफळाच्या तुलनेत आकाराने मोठे असते. अधिक म्हणजे 5 ते 6 दिवस टिकते. त्यामुळे याची बाहेरगावात मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. सध्या इंदौर, अहमदाबाद, बडोदा आणि नागपूर भागांत या फळाची येथून निर्यात होत आहे. गावरानपेक्षा गोडीला कमी असल्याने मधुमेह रुग्णांकडून या फळाला मागणी आहे. काही दिवसांत आवक आणखी वाढेल, भावात घसरण होईल, असे माऊली आंबेकर यांनी सांगितले.
गावरान सीताफळाचीही रविवारी बाजारात 12 ते 15 टन आवक झाली आहे. घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार 10 ते 80 रुपये भाव मिळत आहे. आणखी महिनाभर या फळाची आवक होणार आहे. वडकी, फुरसुंगी, सासवड, शिक्रापूर आणि शिरूर भागांतून या फळाची आवक होत आहे. घरगुती ग्राहकांकडून, किरकोळ विक्रेते, ज्युस, आइस्क्रिम, पल्प बनविणाऱ्यांकडून गावरान सीताफळाला जास्त मागणी आहे.
– पांडुरंग सुपेकर, व्यापारी