फी दरवाढी विरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा संसदेवर मोर्चा 

नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वसतिगृह फी दरवाढीसहित इतर अनेक मुद्द्यांवर मागील पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलन चालू आहे. विद्यार्थ्यांनी आज आपला मोर्चा संसदेकडे वळवला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला आहे.

जेएनयूने केलेली पूर्ण फीवाढ मागे घेण्यात यावी आणि इतर मागण्यांसाठी शेकडोच्या संख्येने विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. आपल्या मागण्यांचे फलक, डफल्या घेऊन गाणी गात आणि घोषणा देत सकाळी साडे अकराच्या सुमारास या विद्यार्थ्यांनी संसदेच्या रस्त्याने वाटचाल सुरु केली आहे.

काय आहे प्रकरण
वास्तविक आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची साधी मागणी ही कुलगुरूंशी किंवा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तेथे आलेले मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल यांच्याशी चर्चा करण्याची संधी द्या एवढीच होती. हे विद्यार्थी विद्यापीठाच्या आवारातील वसतिगृहात जी अवास्तव फी वाढ करण्यात आली आहे त्या विरोधात आंदोलन करीत होते. हा काही फार मोठा किंवा कुलगुरूंनी धास्ती घ्यावी आणि विद्यार्थ्यांशी चर्चाच टाळावी इतका गंभीर विषय नव्हता. पण विद्यार्थ्यांना त्यांचा आंदोलनाचा हक्‍कही नाकारला गेला. वास्तविक वसतिगृहामध्ये करण्यात आलेली दरवाढ अघोरी अशीच आहे. तेथे विद्यार्थ्यांवर सर्व्हिस चार्जेस म्हणून 1700 रुपयांचा जादा भुर्दंड नव्याने लावण्यात आला आहे. मेसची सुरक्षा ठेव आतापर्यंत केवळ पाच हजार रुपये इतकी होती, ती 12 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

वसतिगृहामधील सिंगल सिटर रूमचा दर आतापर्यंत केवळ 20 रुपये इतका होता तो 600 रुपये इतका करण्यात आला असून डबल सिटर रूमच्या भाड्याचा दर दरमहा 10 रुपयांवरून 300 रुपये इतका करण्यात आला आहे. या खेरीज वसतिगृहामधील विद्यार्थ्यांवर ड्रेस कोडचीही सक्‍ती करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकाराला विद्यार्थ्यांचा विरोध होता.

Leave A Reply

Your email address will not be published.