मुंबई – टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबदद्ल मोठा खुलासा केला आहे. 2011 च्या वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्ये शतक बनवण्यापूर्वीच मी बाद झालो आणि यासाठी गंभीरने धोनीला जबाबदार धरले आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.
२ एप्रिल २०११ ला भारतीय क्रिकेट संघाने ICC विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे पार पडलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा तो थरार आजही कोणी विसरु शकलेलं नाही. शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्याने अनेकांचीच स्वप्नपूर्ती केली. त्या सामन्यात गौतम गंभीरच्या ९७ धावा आणि धोनीच्या नाबाद ९१ धावा यांच्या जीवावर भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला. या सामन्यात गंभीरचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. त्या हुकलेल्या शतकाला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जबाबदार आहे, असे गंभीरने म्हटले आहे.
या मुलाखतीमध्ये बोलताना गंभीर म्हणाला की “ मला आजही लक्षात आहे की जेव्हा षटक संपल तेव्हा मी आणि धोनी मैदानावर होतो. मी ९७ धावांवर असल्याची आठवण मला धोनीने करून दिली. धोनी मला म्हणाला की आता केवळ तुला ३ धावा करायच्या आहेत म्हणजे तुझे शतक होईल.
त्याच्या या वाक्यामुळे मला माझ्या धावसंख्येबाबत आठवले. तोपर्यंत मी केवळ प्रतिस्पर्धी संघाने दिलेल्या आव्हानाचाच विचार करत होतो. पण जेव्हा धोनीने मला माझ्या धावसंख्येची आठवण करून दिली, त्यावेळी मी खूपच बचावात्मक खेळू लागलो आणि त्यातच मी बाद झालो. जर मला धोनीने आठवण करून दिली नसती, तर मी कदाचित माझं शतक पूर्ण करू शकलो असतो”, असे तो गंभीरने सांगितले.