पुणे -राज्य सरकारच्या सर्व कार्यालयांमधील दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना लॉकडाऊनच्या काळात कार्यालयीन उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेनेही याबाबत मागणी केली होती. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
सामान्य व्यक्तीच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, अशावेळी करोनासारख्या महाभयंकर आजाराची लागण होण्याची भीती अधिक असते. तसेच, राज्यात लागू असलेल्या संचारबंदीमुळे वाहतूक व दळणवळणाच्या अडचणीही आहेत.
याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांनी अशा सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात उपस्थित राहण्यातून लॉकडाऊनच्या काळात सूट द्यावी, अशी आग्रही मागणी केली होती. अपंग आयुक्तालयामार्फतही याबाबतही या संबंधी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. त्याला यश आले आहे.