ढाका – बांगलादेशात हिंदू मंदिरामध्ये दुर्गा पूजा सुरू असताना काही गुंडांनी केलेल्या हल्ल्यात तिघे जण ठार झाले आहेत. यावेळी उसळलेल्या दंगलीमध्ये आणखीन काही जण जखमी झाले आहेत. राजधानी ढाकापासून 100 किलोमीटर अंतरावरील कुमिला येथे ही घटना घडली.
ऐन सणाच्या दिवसात झालेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे.
ईशनिंदेच्या आरोपांमुळे त्यामुळे सरकारने 22 जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दले तैनात केली आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंदिरामध्ये घुसून केलेल्या तोडफोडीवर आणि भाविकांच्या हत्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
याव्यतिरिक्त चांदपूरच्या हाजीगंज, चटोग्रामच्या बंशखाली आणि कॉक्स बझारच्या पेनुका या भागांमध्येही हिंदू मंदिरांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत. एका क्षणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि दुर्गापूजेचे मंडप ज्या ठिकाणी उभारले गेले आहेत तेथेच दंगलींना सुरुवात झाली.
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावरही हल्ले झाले. नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेश रॅपिड ऍक्शन बटालियनच्या दहशतवाद विरोधी आणि गुन्हेगारी प्रतिबंधक पथकाला पाचारण करण्यात आले, असे स्थानिक वर्तमानपत्राने म्हटले आहे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन धार्मिक कार्य मंत्रालयाने केले आहे.