Supriya Sule – पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडमधील जो प्रकार उघडकीस आला आहे तो “अत्यंत चिंताजनक” आहे. तसेच पेटीएम पेमेंट्स बँकेचा घोटाळा हा मनी लाँड्रिंगसारखच प्रकार असून गूगल पे, फोनपे हे वॉलेट अॅप टिक टिक करणारे टाइम बॉम्ब आहेत, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरदार बॅटिंग केली. यावेळी वॉलेट अॅपवरून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरत कोणकोणत्या उपाययोजना राबवत आहात? असा प्रश्नसुद्धा सरकारला विचारला.
मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटच्या अधिवेशनात यूपीए १ आणि यूपीए २ च्या काळातील अर्थव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढली. त्यावरून संसदेत वादविवाद चालू होता.
त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या घोटाळ्याचा आणि त्यावरील कारवाईचा उल्लेख करत म्हणाल्या, हे प्रकरण आपल्यासाठी एक प्रकारचा इशारा आहे. हे मनी लाँड्रिंगचंच प्रकरण आहे.
गूगल पे, फोन पे हे दोन टाइम बॉम्ब आहेत. यूपीआय पेमेंट्ससाठी याचा अॅप्सचा वापर केला जात आहे. परंतु, सरकार डिजीटल आणि कॅशलेस इकोनॉमीसाठी काय-काय करत आहे, असे प्रश्न उपस्थित केले.