गुड-टच, बॅड-टच

माणसाला प्राण्यापासून वेगळं बनवते ती भावनाच! शरीरातले बदल आणि शारीरिक गरजा, शारीरिक भूक ही प्राण्यांनाही असतेच. पण याचा संबंध माणूस भावभावनांशी जोडतो आणि म्हणूनच तो प्राण्यापासून वेगळा ठरतो.

स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं कसब माणसाकडे असलं पाहिजे आणि म्हणूनच शरीर-शुचितेचा संस्कार जाणीवपूर्वक बिंबवला जातो. पण आपल्या संस्कृतीतील इतर गोष्टींचे जसे आपण अवडंबर करतो तसेच याही गोष्टीचे अवडंबर केले जाते; आणि पर्यायाने याही गोष्टीला विरोध होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“गुड टच, बॅड टच’ची चर्चा व्हायलाच हवी; पण भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा संस्कार घराघरातून व्हायला हवा. स्त्री किंवा पुरुष म्हणून फक्त “एक लिंग’ ही आपली ओळख न रहाता माणूस म्हणून जगण्याची कला अवगत व्हायला हवी आणि त्यासाठी जाणीवपूर्वक संस्कार झाले पाहिजेत. दृष्य माध्यमांचा, सोशल मीडियाचा अपरिहार्य वाढता वापर, त्यातून मिळणारं अनावश्‍यक ज्ञान, स्त्री पुरुष संबंधांची होणारी अनावश्‍यक चर्चा, त्यातलं नेमकेपण आणि त्यातून जागृत होणारी लालसा हा खरंच चिंतेचा विषय आहे. स्त्री-पुरुष संबंधांकडे फक्त एक विज्ञान म्हणून पहाण्याचा वाढता कल आणि त्यातून या गोष्टीकडे पहाण्याचा दूषित दृष्टीकोन. “शरीर मागतंय ते पुरवायचं, कोणत्याही मार्गाने,’ ही वृत्ती वाढतेय.

पूर्वी या गोष्टींबद्दलची नको इतकी गोपनीयता त्यामुळे भावनांचा निचरा होत नव्हता. आता मात्र अतीपरिचयात अवज्ञा अशी अवस्था आहे. रस्त्याने जाताना एखाद्या आंबटशौकिनाने मारलेला धक्का, एखादया सहकाऱ्याची अनावश्‍यक सलगी, एखाद्या नातेवाईकाचे अनावश्‍यक प्रेम, हे अनुभव येत असतात; पण दोन मुलींची आई झाल्यावर तर ही काळजी घर करून रहाते. आपल्या मुलींना आपल्याशी अगदी कुठल्याही विषयावर बोलताना मोकळीक वाटली पाहिजे. मी त्यांची मैत्रीणही आहे, हे त्यांना वाटलं पाहिजे, हा प्रयत्न मी नेहेमीच केला.

आज प्रत्येकाची सहनशक्ती खूप कमी झाली आहे. छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये अहंकार जोपासला जातो. पण या गोष्टीकडे मात्र खूपच कॅज्युअली बघीतले जाते. मग “मी-टू’ सारख्या चळवळी येतात. पण जुनी मढी उकरून काढण्यापेक्षा घटना घडतानाच विरोध करण्याचे धाडस प्रत्येकात यायला हवं. क्षणिक फायद्यासाठी काय “वाट्टेल ते’ करण्याची तयारी दर्शवण्याने समाजामधलं संतुलन बिघडत चाललं आहे. माझी स्कुल खूपच छोटी आहे. प्री प्रायमरी आहे तरी मुलांना “गुड टच-बॅड टच’विषयी आम्ही सांगतो. पण समजावून सांगताना खूप भान ठेवावे लागते. अनावश्‍यक भीती बसणंही समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातकच आहे .

जागतिकीकरणाचा रेटा मान्य करून आधुनिकीकरण हे फक्त भौतिक नसते तर वैचारिकही असते हे मान्य करून ते अंगीकारणं आवश्‍यक आहे. त्यासाठी आपल्या संस्कृतीतल्या अतिशय सुंदर गोष्टी जसं, नातेसंबंधांना महत्त्व. निष्ठा, शरीरशुचिता हे संस्कार योग्य प्रमाणात करणं मान्य करणं हीच काळाची गरज आहे. नाहीतर बुडत्याचा पाय खोलात अशी आपली अवस्था होईल.

– अपर्णा कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)