नवी दिल्ली – करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विकसित करण्यात आलेल्या “कोविशिल्ड’ या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांसाठी उमेदवारंची भरती पूर्ण झाली असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात “आयसीएमआर’ आणि सीरम इन्स्टिट्युटने आज जाहीर केले.
“कोविशिल्ड’ लस अमेरिकेतील नोवावॅक्स कंपनीने विकसित केली आहे. तर या लसीची गुणवत्ता वाढ सीरम इन्स्टिट्युटने केली आहे, असे या संदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
“आयसीएमआर’ आणि सीरम इन्स्टिट्युटच्यावतीने या लसीच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जात आहेत. करोनाच्या साथीच्या भीषण परिणामांना आटोक्यात आणण्यासाठी या दोन्ही संस्थांनी भागीदारी केली आहे, असे “आयसीएमआर’ने म्हटले आहे. या वैद्यकीय चाचण्यांसाठी लागणारा निधी “आयसीएमआर’ पुरवला आहे. तर सीरम इन्स्टिट्युटच्यावतीने कोविशिल्डसाठी लागणारा अन्य खर्च केला जात आहे.
सद्यस्थितीत देशभरात 15 वेगवेगळ्या ठिकाणी कोविशिल्डची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेतली जात आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठीच्या उमेदवारांची भरती प्रक्रिया 31 ऑक्टोबर रोजीच समाप्त झाली आहे.
या लसीच्या आतापर्यंतच्या चाचण्यांना मिळालेल्या सकारात्मक परिणामांमुळे ही लस करोनावर निश्चितच परिणमकारक ठरू शकेल असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे सीरम इन्स्टिट्युटने म्हटले आहे.