नवी दिल्ली – नोकरदार वर्ग प्रत्येकवर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच वेतनवाढीची वाट पाहत असतात. प्रत्येकवर्षी वेतनवाढ होत असते. मात्र गेल्या वर्षी करोना साथीमुळे बहुतांश ठिकाणी वेतनवाढ झाली नाही. मात्र यावर्षी मार्केटची स्थिती चांगली असून वेतनवाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विलिस टावर्स वाटसन नावाच्या कंसलटिंग आणि एडवायजरी फर्म कंपनीने सांगितले आहे की, अनेक कंपन्या वेतनवाढ देण्यासाठी तयार आहेत. यावर्षी जवळपास 6.4 टक्क्यांनी वेतनवाढ होऊ शकते जी मागील वर्षीपेक्षा जास्त आहे.
विलिस टावर्स वाटसन कंपनीने सांगितले की, काही भारतीय कंपन्यांनी गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 5.9 टक्के वेतनवाढ दिली. मात्र यावर्षी यात वाढ होणार आहे. यंदा बाजार आशावादी असून करोनाच्या संकटानंतर सर्व व्यवहार बऱ्यापैकी रूळावर आले आहेत. याच कारणामुळे कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यास मागे हटणार नाहीत.
विलिस टावर्स वाटसनच्या म्हणण्यानुसार, यावेळी कंपन्या कुशल कर्मचाऱ्यांवर जास्त पैसे खर्च करणार आहेत. त्यांनी म्हटलेय की, सध्या मार्केट सुरळीत सुरू आहे. अशावेळी कंपन्यांसमोरही मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे कंपन्या आपल्या जुन्या स्टाफला सोबत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांसाठी थोडी जास्त रक्कम मोजण्यासही कंपन्या तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.
फर्मच्या रिपोर्टनुसार, हाय टेक्नाॅलाॅजी, फार्मास्यूटिकल्स, कन्ज्यूमर प्रोडक्ट, रिटेल प्रोजेक्ट यांमध्ये जवळपास 8 टक्क्यांनी वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. फायनांशिअल सर्व्हिस, मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टर मध्ये जवळपास 7 टक्के, तर बीपीओ सेक्टर मध्ये 6 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. एनर्जी सेक्टरमध्ये सर्वात कमी वेतनवाढ होईल. केवळ 4.6 टक्के वेतनवाढ होईल असे सांगितले जात आहे.