मुंबई – काँग्रेसनेते आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सध्या विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याची प्रतीक्षा आहे. मात्र हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. यावर काँग्रेसनेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रसची भूमिका स्पष्ट केली.
विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे. त्यावर काँग्रेसचा हक्क असून या पदावर काँग्रेसच्याच व्यक्तीची नियुक्ती होईल, असा दावा काँग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. विधिमंडळाचे अधिवेशन एक मार्चपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी आठ-दहा दिवस आधी तिन्ही पक्षांतील पदाधिकारी एकत्र बसून आम्ही याबाबत निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद याआधी थोरात यांच्याकडे होते. मात्र पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष असावा या कारणामुळे नाना पटोले यांची निवड करण्यात आली आहे. यावर थोरात म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदी अन्य व्यक्तीची निवड झाली म्हणून आपल्याला वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. मी काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्य समितीचा सदस्य आहे. इतरही अनेक पदे माझ्याकडे आहेत. त्यामुळे एखादे पद सहकाऱ्याला दिल्यास वाईट वाटण्याचे कारण नाही, असेही थोरात म्हणाले.