वॉशिंग्टन – अमेरिकेत येत्या जानेवारी महिन्यापासून करोनावरील लसीचे वितरण सुरू होईल असा विश्वास तेथील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तथापि अमेरिकेत आता हिवाळा सुरू होत असून या काळात करोनाच्या प्रसारात वाढ होण्याचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
त्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेच्या प्रशासनाने अद्याप काहीही उपायोजना केलेली नाही असा आक्षेप अनेकांनी घेतला आहे.
तथापि जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष लसीचेच वितरण सुरू होत असल्याने काळजीचे कारण नाही असे डॉ. रॉबर्ट काडलेक या आरोग्य तज्ज्ञाने म्हटले आहे. ते अमेरिकेच्या आरोग्य सेवेचे सहायक प्रमुख आहेत. या वर्षाच्या अखेरीपर्यंत म्हणजे डिसेंबर पर्यंत लसीच्या प्रमाणिकरणाला मान्यता मिळेल आणि त्यानंतरच्या महिन्यात प्रत्यक्ष लसीच्या वितरणाला सुरुवात होंईल असे त्यांनी म्हटले आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांनी मात्र ऑक्टोबर महिन्यातच लसीच्या वितरणाला प्रारंभ होईल असे विधान केले होते. पण त्यांच्या दाव्याला त्यांच्याच प्रशासनाने छेद दिला आहे. अमेरिकेत डिसेंबर पर्यंत करोनावरील लसीचे सुमारे दहा कोटी डोस तयार ठेवले जात आहेत, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. लसीच्या प्रमाणिकरणाला लागणारा वेळ हेच आज आमच्या पुढचे सर्वात मोठे आव्हान आहे असे त्यांनी म्हटले आहे.