गुड न्यूज : ऑगस्टमध्ये आणखी एक भारतीय लस येणार; महिन्याला 7 कोटी लस तयार करण्याची क्षमता

नवी दिल्ली – करोनावर भारतात विकसित करण्यात आलेली आणखी एक जैविक ई-लस ऑगस्टमध्ये उपलब्ध होणार आहे. हैदराबाद येथील बायोलॉजिकल ई या कंपनीने ही लस तयार केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही लस केंद्र सरकारच्या मदतीने विकसित केली जात आहे. या लसीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी संपली आहे आणि लवकरच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरवात होणार आहे. ही लस यशस्वीरित्या विकसित झाल्यास संबंधित संस्था महिन्याला 7 कोटी डोसचे उत्पादन करू शकते, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

देशात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्‍सिन या दोन लसींद्वारे नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. कोविशिल्ड ही लस ऑक्‍स्फर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केली आहे. या लसीचे उत्पादन भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटद्वारे केले जात आहे. तर केंद्र सरकारची संस्था आयसीएमआरच्या मदतीने भारत बायोटेकने कोवॅक्‍सिन लस विकसित केली आहे. कोवॅक्‍सिन ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे.

बायोलॉजिकल ई च्या पहिल्या दोन टप्प्यांतील लसींचा डेटा लवकरच सादर केला जाणार असून त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरूवात होणार आहे. ही कंपनी केवळ आपल्याच लसीचे उत्पादन करणार नसून अमेरिकेच्या जॉन्सन अँड जॉन्सनच्या 1 अब्ज लसींचेही उत्पदन करणार असल्याचे पॉल यांनी सांगितले. करोनाच्या विरोधातील अन्य लसींचे दोन डोस दिले जातात. मात्र जॉन्सनच्या लसीचा केवळ एकच डोस दिला जातो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.