हाताचे मनगट दुखण्याची समस्या अशी करा दूर…

आपण काम करता करता आपल्या हाताचे मनगट दुखू लागते. काही तरी लचकले असेल म्हणून आपण दुर्लक्ष करतो, पण नंतर या वेदना इतक्‍या वाढतात की सहन होत नाहीत. मग त्यावर काही मलम लाव, पेनकिलर घे, शेक दे असले प्रयोग सुरू होतात. साधे मनगट तर दुखतेय होईल बरे, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले तर पुढे शस्त्रक्रिया करण्याचीही वेळ येऊ शकते. तुम्ही जर तासन्‌तास कॉम्प्युटरवर काम करत राहिल्याने किंवा खूप मोठया वजनाची वस्तू उचलल्यामुळे अचानक मनगटात वेदना होऊ लागतात. मनगटात दुखण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते. थंडीच्या दिवसांत या वेदना आणखी वाढतात.

कार्पल टनल सिंड्रोम
सतत कॉम्प्युटरवर माऊस आणि कीबोर्डचा वापर केल्याने हाताची बोटे आणि मनगटावर जोर पडू लागतो. अनेकदा सूजही येते, त्यामुळे मनगट सुन्न होते किंवा मुंग्या आल्याप्रमाणे झिणझिण्या येतात. याला कार्पल टनल सिंड्रोम असे म्हणतात. कार्पल टनल म्हणजे मनगटाजवळ असलेली एक अरुंद, बोगद्याप्रमाणे असलेली नलिका मार्ग आहे. याला जोडलेल्या नसा आणि तंतू अंगठा, मधले बोट आणि करंगळीला जोडलेले असतात. अशा वेळी जेव्हा केव्हा मनगटाच्या आसपास पेशी आणि नसांवर दाब येतो तेव्हा त्याचा परिणाम बोटे आणि हाताच्या तळव्यावर होऊ लागतो.

जुनी जखम
एखादी जुनी जखम मनगटातील वेदनेचे कारण असू शकते. जेव्हा जखम होते तेव्हा ती बरी झाल्यावर आपण विसरून जातो. मनगटाला काही जखम झाली असेल तर त्याचे पूर्ण परीक्षण करणे आवश्‍यक आहे. मनगटाच्या हाडाला काही दुखापत तर झालेली नाही ना याची खात्री करा. विशेषत: खेळाडूंना याची जास्त गरज असते. मनगट दुखण्याची समस्या महिलांना गरोदर असताना, मेनोपॉज आणि लठ्ठपणा वाढल्यावर निर्माण होते.

यावरचे उपाय
रोज सकाळ-संध्याकाळ वेदनाशामक तेलाने मनगटाला मालिश करा. काही वेळ मनगटाला आराम द्या. डॉक्‍टर प्लिंट घालण्याचाही सल्ला देतात.
मनगट दुखत असेल तर त्याची जास्त हालचाल करू नका. वजनदार वस्तू उचलू नका. कॉम्प्युटरवर जर सतत हातांच्या जोरावर काम करत असाल तर हातांना जरा आराम द्या. “स्माइली बॉल’ने व्यायाम करा.
जेव्हा मनगटांत दुखू लागते तेव्हा ते बर्फाने शेका. त्यामुळे वेदनेपासून आराम मिळतो.

वेदनाशामक औषधांचा वापर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानेच करा.
मनगटात जास्तच दुखत असेल किंवा वारंवार दुखत असेल तर डॉक्‍टरांना दाखवाच, पण तुमच्या काम करण्याच्या पद्धतीतही बदल करा. फिजिओथेरपी आणि औषधाने लवकर आराम मिळतो.

मनगटाची योग्य स्थिती
काम करताना मनगट योग्य स्थितीत असणेही आवश्‍यक आहे. कॉम्प्युटरवर काम करताना दीर्घकाळ मनगट योग्य स्थितीत टेबलावर न ठेवणे, सतत एकाच हाताने काम करणे, बोटांना आराम न देणे किंवा सतत जड मोबाइल हातात पकडून ठेवणे ही मनगट दुखण्याची कारणे असतात. कॉम्प्युटरवर काम करत असाल तर मनगटाला सपोर्ट देणाऱ्या माऊस पॅडचा वापर करा. काम करताना दोन्ही हातांची ढोपरे शरीराच्या दोन्ही बाजूंना आरामाच्या स्थितीत असली पाहिजेत.

व्यायाम आवश्‍यक
शरीरातील सर्व भागांत योग्य तऱ्हेने रक्‍तसंचार न होणे हेही मनगट दुखण्याचे कारण असू शकते. नियमित व्यायाम करण्याने रक्‍तसंचार व्यवस्थित होतो आणि हळूहळू मनगटाच्या ठिकाणी ऑक्‍सिजनचे प्रमाण वाढू लागते. मनगटाचा हलका व्यायाम त्याच्या आसपासच्या भागातील नसा आणि स्नायूंना लवचिक बनवतो. त्यामुळे वेदनेपासून आराम मिळतो. मनगट एकदा घड्याळाच्या दिशेने आणि एकदा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवल्यानेही वेदनेपासून आराम मिळतो. व्यायाम डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन करा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.