पिंपरी – विनामास्क फिरणाऱ्या, सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच करोना नियमांचे पालन न करणाऱ्या 140 जणांची भोसरी पोलिसांनी करोना चाचणी केली. त्यात सहाजण करोना बाधित असल्याचे आढळून आले. बाधित नागरिकांना 14 दिवस होम क्वॉरंटाइन केले जाणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनो विनाकारण घराबाहेर फिरत असाल तर सावध व्हा, असा इशारा पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी मार्केटमधील सुमारे सव्वाशे विक्रेत्यांना गुरुवारी (दि. 22) पिंपरी चिंचवड पोलिसांनी मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले. महापालिकेचे भोसरी रुग्णालय आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने त्या विक्रेत्यांची दापोडी पोलीस चौकीत अँटीजेन टेस्ट देखील करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी या विक्रेत्यांना सामाजिक अंतर तसेच अन्य नियमांचे महत्व पटवून दिले.
त्याचबरोबर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासोबतच त्यांची देखील पोलिसांनी 140 जणांची करोना अँटीजेन टेस्ट केली. या टेस्टिंगमध्ये आज सकाळपासून सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ज्या रुग्णांना काहीही लक्षणे नाहीत त्यांना होम क्वॉरंटाईन केले जात आहे. तर सौम्य लक्षणे असणाऱ्यांवर योग्य उपचार केले जात आहेत. गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. त्यामुळे कारवाईसोबतच पोलिसांनी आता जनजागृती देखील सुरू केली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे म्हणाले, करोनाचा प्रसार फार वेगाने होत आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं सध्या जिकरीचे झाले आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. ही मोहीम पुढे वाढवून पोलिसांकडून जनजागृतीपर काम देखील मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे.