मंचर -पोल्ट्री व्यावसायाच्या इतिहासात प्रथमच ब्रॉयलर चिकनचे दर 240 रुपये प्रतिकिलो झाल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना “अच्छे दिन’ आले असले, तरी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पोल्ट्री व्यावसायिकांनी उन्हाळ्यात पाण्याअभावी बहुतांशी पोल्ट्री फार्म बंद ठेवले आहेत. याबरोबरच मका, सोयाबीन या खाद्यपदार्थाचे भाव वाढल्यामुळे, तसेच पेटोल, डिझेल वाढ झाल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे, त्यामुळे पंधरा दिवसापूर्वी 200 रुपये किलो दराने मिळणारे चिकनची सध्या 240 रुपये किलो दराने विक्री करावी लागत आहे.
बॉयलर कोंबड्यांच्या मालाचा तुटवडा जाणवू लागल्याने, तसेच चिकनचे बाजारभाव वाढल्याने ग्राहक, हॉटेल व्यावसायिक यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. गेल्या पंधरा दिवसापासून बॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.बहुतांशी भागातील पोल्ट्री फार्म पाण्याच्या कमतरतेमुळे बंद आहेत. घाऊक बाजारामध्ये मालाचा तुटवडा असल्याने बॉयलर कोंबडीच्या लिफ्टिंग रेटमध्ये रोजच वाढ होत असल्याने कंपनी चालकांना सुगीचे दिवस आल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात
येत आहे.
अंड्यांचे दर कोसळले
अंड्याच्या बाजारभावामध्ये गेल्या आठ दिवसात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाल्यामुळे अंड्याचे दर कोसळले आहे. सध्याच्या स्थितीमध्ये बाजारात किरकोळ अंडी विक्री पाच रुपये दराने होत आहे. अंड्याचे बाजारभाव अचानक कोसळल्याने अंडी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
मध्यंतरी करोना काळात मोठ्या प्रमाणावर कंपन्यांचे आणि शेतकरी उत्पादकांचे नुकसान झाले होते. ते आता कुठेतरी थोड्याफार प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे. बॉयलर कोंबडीचे लिफ्टिंग रेट 135 ते 140 रुपयांच्या घरामध्ये जाऊन पोहोचले आहे, त्यामुळे घाऊक बाजारामध्ये चिकनच्या रेटमध्ये वाढ होऊन सध्या किरकोळ विक्रेते 240 रुपये किलो चिकन विकत आहेत.
इसाक शेख, चिकन विक्रेते, कळंब
करोनाकाळात पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक तोटा झाला होता. सध्याचा दर पाहता पोल्ट्री व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत. चिकनचे दर अजूनही वाढण्याची शक्यता आहे. पाण्यामुळे पोल्ट्री बंद आहेत. मागणी वाढल्याने त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने बहुधा दर वाढले असल्याची शक्यता आहे.
– शफीभाई मोमीन (शिनोली), प्रमोद हिंगे पाटील (मंचर), व्यावसायिक