नवी दिल्ली – अमेरिकेची अर्थव्यवस्था कमकुवत होत असल्यामुळे डॉलर घसरत आहे. याचा परिणाम सोन्याचे दर वाढण्यात होत आहे. त्यामुळे भारतातही सोन्याचे दर सध्या तीन महिन्याच्या विक्रमी पातळीवर गेले आहेत.
सोमवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 348 रुपयांनी वाढून 47,547 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 936 रुपयांनी वाढून 71,310 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,853 डॉलर तर चांदीचा दर 27.70 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. या संबंधात एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकेची अर्थव्यवस्था कमकुवत झाल्यामुळे डॉलर घसरत असून अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदार सोन्याकडे वळू लागले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत.
भारत आपल्या गरजेचे बहुतांश सोने आयात करीत असल्यामुळे जागतिक बाजारातील किमतीचा भारतीय किमतीवर लगेच परिणाम होतो.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस संस्थेचे विश्लेषक नवनीत दमानी यानी सांगितले की, डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सध्या सोन्याचे दर तीन महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. बऱ्याच विश्लेषकांनी आगामी काळात सोन्याचे दर वाढून 50 हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.