Corona Vaccination | कोविड लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचे भारतातील प्रमाण अत्यल्प

नवी दिल्ली, दि. 17 – कोविडची लस दिल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण भारतात अत्यल्प असून, अशा स्थितीची अपेक्षित आकडेवारीही योग्य आहे. लसीकरणोत्तर विपरीत परिस्थितीविषयक राष्ट्रीय समितीने आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाला दिलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

लस घेतल्यानंतर रक्तप्रवाहात अडथळा येण्याच्या अथवा रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या घटनांबद्दल काही देशांमध्ये 11 मार्च रोजी धोक्‍याची सूचना देण्यात आली होती. या घटनांच्या संदर्भाने भारतात लसीच्या विपरीत परिणामांचे सखोल विश्‍लेषण करण्याचा निर्णय ताबडतोब घेण्यात आला. समितीने नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार, 3 एप्रिल पर्यंत लसीच्या 7 कोटी 54 लाख मात्रा देण्यात आल्या. यापैकी पहिल्या मात्रांची संख्या 6 कोटी 59 लाख 44 हजार 106 इतकी होती, तर दुसऱ्या मात्रांची संख्या 94 लाख 91 हजार 275 इतकी होती.

कोविड-19 प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम सुरु केल्यापासून 23,000 पेक्षा अधिक विपरीत परिणाम झाल्याची नोंद झाली. देशातील 753 पैकी 684 जिल्ह्यांमध्ये अशा नोंदी झाल्या. यापैकी केवळ 700 म्हणजे दर दशलक्ष मात्रांमागे 9.3 व्यक्तींची स्थिती गंभीर असल्याचे नोंदले आहे.
अशा 498 गंभीर आणि तीव्र प्रकरणांचा सखोल आढावा समितीने घेतला असून त्यापैकी 26
व्यक्तींच्या बाबतीत रक्तात गुठळी होण्याची संभाव्यता वर्तविली जात आहे.

ही गाठ रक्तवाहिनीतून वाहत जाऊन दुसऱ्या वाहिनीचा प्रवाहही थांबवू शकते. कोव्हीशील्ड लस घेतल्यानन्तर असे परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविली जात असून तसे होण्याचा दर दहा लाख मात्रांमागे 0.61 इतका आहे. कोव्हॅक्‍सीन लस दिल्यानन्तर रक्ताच्या गुठळ्या होणे किंवा तशी संभाव्यता असण्याच्या प्रकारांची नोंद झालेली नाही.

भारतातील आकडेवारीतून असे दिसते की, अशा पद्धतीने रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या धोक्‍यांची संख्या अत्यल्प असली तरी तसे धोके टाळता येतील असे आहेत. असे प्रकार होण्याचा भारतातील दर दहा लाख मात्रांमागे 0.61 असून, इंग्लंडमध्ये तो 4 तर जर्मनीत 10 इतका आहे.
सर्वसामान्य जनतेमध्ये अशा पद्धतीने रक्तात गुठळ्या होऊ शकतात. दक्षिण आणि आग्नेय आशियाई वंशांच्या व्यक्तींमध्ये युरोपीय वंशांपेक्षा याचा धोका सुमारे 70 टक्के कमी असतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.