नवी दिल्ली – अमेरिकन संसदेने नवे पॅकेज देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे डॉलर वधारून जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात घसरण झाली. भारतीय सराफातही सोन्याचे आणि चांदीचे दर काही प्रमाणात घसरले.
मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 243 रुपयांनी कमी होऊन 49,653 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचा भाव 216 रुपयांनी कमी होऊन 67,177 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,868 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 25.70 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेले.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषण तपन पटेल यांनी सांगितले की, ज्या प्रमाणात डॉलर मजबूत झाला त्या प्रमाणात सोन्याचे दर ( Gold Price Today ) कमी झाले.
या विषयावर मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमाणी यांनी सांगितले की, अमेरिकन कॉंग्रेसने 900 अब्ज डॉलरच्या पॅकेजला मंजूरी दिली आहे. त्यामुळे डॉलरचा भाव वाढत गेला. त्याचबरोबर नफेखोरीसाठी काही प्रमाणात सोन्याची विक्री झाली. या कारणामुळे भारतीय बाजारपेठेतही सोने आणि चांदीचे दर ( silver price today ) काही प्रमाणात कमी झाले.
मात्र ब्रिटनमधील नव्या प्रकारच्या करोनामुळे जागतिक विमान वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. अशा परिस्थितीत संदिग्धता निर्माण झाल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम संभवतो. त्यामुळे सोने जास्त प्रमाणात घसरण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात कमी आहे असे विश्लेषकांना वाटते. सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली गेले तर दीर्घ पल्ल्याच्या दृष्टिकोनातून काही प्रमाणात खरेदी करण्यास हरकत नाही असे विश्लेषक सुचवितात.