करोनाच्या “नव्या’ विषाणूवरही लस प्रभावी; “बायोनटेक’ला आपल्या उत्पदनावर पूर्ण विश्‍वास

नवी दिल्ली – इंग्लंडमध्ये सापडलेल्या करोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूवर आपली लस प्रभावी ठरेल, असा विश्‍वास जर्मन औषध कंपनी बायोनटेकने केला आहे. मात्र, या बाबत नेमकेपणाने सांगण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.

इंग्लंडच्या ईशान्य भागात आणि लंडनमध्ये सापडलेल्या करोनाच्या नव्या विषाणूमुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. हा विषाणूचा प्रसार अधिक सहजतेने होत असल्याचे आढळून आले आहे. अर्थात त्यामुळे कोणतेही अधिक गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे कोणतीही चिन्हे समोर आली नाहीत. पण इंग्लंडमधून येणाऱ्यासांठी अनेक देशांनी आपली द्वारे बंद केली आहेत.

आमचे उत्पादन या नव्या विषाणूचा प्रतिबंध करण्यास सक्षम आहे का? याबाबत आम्ही अत्ताच काही सांगू शकत नाही. पण शास्त्रीय दृष्टीकोनातून या लसीमुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती नव्या विषाणूचा मुकाबला करू शकेल, असे बायोनटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी उगुर साहिन यांनी सांगितले. या लसीच्या आपत्कालीन वापराला युरोपीयन महासंघाने परवानगी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

इंग्लंडमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूच्या प्रकारातही करोनाच्या आधिच्या विषाणूप्रमाणे 99 टक्के प्रथिने आहेत. त्यामुळेच बायोनटेकला त्याच्या लसीच्या उपयुक्ततेबद्दल शास्त्रीय विश्‍वास आहे. मात्र त्यावर अधिकृतरित्या भाष्य करण्यापुर्वी प्रयोग करावे लागतील त्यासाठी किमान दोन आठवड्याचा कालावधी लागेल.

मात्र आमच्या लसीच्या उपयुक्ततेची शक्‍यता खूप जास्त आहे. नव्या स्वरूपाच्या विषाणूवर प्रभावी ठरण्यासाठी लसीत काही बदल करावे लागले, तर ते सहा आठवड्यात करू शकेल, मात्र त्या लसीचा पहिला डोस देण्यापुर्वी नियामकांची परवानगी पुन्हा आवश्‍यक असेल, असे साहीन म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.