नवी दिल्ली – काल सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. आजही सोन्याचा दराबरोबर चांदीचे दर कमी झाल्याचे दिसून आले. दिल्ली सराफत सोन्याचे दर 480 रुपयांनी कमी होऊन 47,702 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. त्याचबरोबर चांदीचे दर 3,097 रुपयांनी कमी होऊन 70,122 रुपये प्रति किलो झाले. काल चांदीचा दर चांगला वाढला होता.
जागतिक बाजारात आज सोन्याचे दर कमी होऊन 1,847 डॉलर प्रति औंस झाले तर चांदीचे दर कमी होऊन 27.50 डॉलर प्रति औंस झाले. अमेरिकेने जाहीर केलेले पॅकेज प्रत्यक्षात लवकर येण्याची लक्षणे दिसत नाहीत. त्याचबरोबर काही गुंतवणूकदार नफा काढून घेत असल्यामुळे सोन्याचे दर कमी झाले असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटी विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
मोतीलाल ओसवाल फायनान्सीयल सर्व्हीसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर सध्याच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदार लवकर नफा काढून घेत असल्यामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत.