नवी दिल्ली -जागतिक शेअरबाजारातील वातावरण अस्थिर असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार सोने आणि चांदीचा आधार घेऊ लागले आहेत. महागाई वाढण्याची शक्यता बळावल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचे दार 97 रुपयांनी वाढून 46,758 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 1,282 रुपयांनी वाढून 70,270 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,788 डॉलर व चांदीचा दर 26.90 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, करोनाची परिस्थिती बिघडली तर सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.