नवी दिल्ली – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे भारतीय बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 253 रुपयांनी वाढून 47,100 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 61 रुपयांनी कमी होऊ होऊन 65, 730 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,813 डॉलर तर चांदीचा दर 25.60 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले, करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेच्या रोख्यावरील परतावा कमी होत असल्यामुळे सोन्याकडे गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ नोंदली जात आहे. करोना आटोक्यात आल्यानंतरच या आघाडीवर स्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.