नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊनही भारतीय बाजारात मात्र शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात भरीव वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 555 रुपयांनी वाढून 45,472 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 975 रुपयांनी वाढून 58,400 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. रुपयाचे मूल्य सकाळच्या सत्रात 12 पैशांनी कमी झाले होते. तर डॉलरचा भाव वाढत होता या घटनाक्रमाचे सोन्याच्या मूल्यावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले.
जागतिक बाजारात सोन्याचा दर काही प्रमाणात कमी होऊ होऊन 1752 डॉलर व चांदीचा दर 22.16 डॉलर प्रति औंस या पातळीवर राहिला. जागतिक बाजारात डॉलर बळकट होत असल्यामुळे आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली असल्याचे दिसून आले.
आगामी काही काळ जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र भारतामध्ये आगामी काळात बरेच सण येणार आहेत. त्यामुळे या काळात सोन्याची खरेदी वाढेल असे अनेकांना वाटते.